अमेरिकी पुराव्यांनी पाकचे वस्त्रहरण
By Admin | Published: July 31, 2016 05:21 AM2016-07-31T05:21:53+5:302016-07-31T06:43:39+5:30
पठाणकोट हल्ल्यातील जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी पाकमधील सूत्रधारांच्या संपर्कात होते, असे पुरावे अमेरिकेने दिले
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यातील जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी पाकमधील सूत्रधारांच्या संपर्कात होते, असे पुरावे अमेरिकेने दिले असून, त्यामुळे पाकिस्तानचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. पठाणकोट हल्ल्यातील चार अतिरेकी आणि पाकिस्तानातील त्यांचा म्होरक्या काशिफ जान यांच्यातील चॅटिंग व संवाद असलेले १ हजार पानांचे दस्तावेज अमेरिकेकडून भारताला मिळाले आहेत.
पठाणकोटमधील हल्ला पाकमधूनच नियंत्रित केला जात होता. त्यातील नासीर हुसैन पाकच्या पंजाबचा, अबू बकर गुजरणवालातील, उमर फारुख आणि अब्दुल कय्यूम हे सिंधमधील होते. हे चारही अतिरेकी मारले गेले होते. या काळात ते पाकमधील म्होरक्यांच्या संपर्कात होते. या हल्ल्याचे नियंत्रण करणारा म्होरक्या काशिफ जान याचे पाकिस्तानातील जैशच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबतच्या संभाषणाचा तपशीलही त्यात आहे. एनआयए दस्तावेजांची छाननी करीत आहे.
माहितीनुसार, काशिफ जान व्हॉट्स अॅप व अन्य संपर्क प्लॅटफॉर्मवरून अतिरेक्यांच्या संपर्कात होता. याच मोबाइल क्रमांकावरून त्याचे एक फेसबुक खातेही सक्रिय होते. त्यावरून तो अतिरेक्यांना सूचना देत होता. हल्ल्याच्या वेळी सक्रिय असलेली खाती पाकिस्तानातील दूरसंचार कंपन्यांच्या (टेलिनॉर आणि पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी, इस्लामाबाद) आयपी अॅड्रेस वापरत होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>भारताची बाजू भक्कम
अतिरेक्यांनी अल-रहमत ट्रस्टच्या क्रमांकावरही संपर्क साधल्याचे आढळून आले आहे. अल-रहमत ट्रस्ट ही जैश-ए-मोहंमदची वित्तीय शाखा आहे. पठाणकोटमधील अतिरेक्यांचे पाकिस्तानात थेट लागेबांधे असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर एनआयएने अमेरिकेकडे त्यासंबंधीचा तपशील मागविला होता.
अमेरिकी अधिकाऱ्यांनी अत्यंत विस्तृत तपशील पुरविल्याने भारताची बाजू मजबूत झाली आहे. द्विपक्षीय विधि साहाय्य कराराच्या आधारे हे दस्तावेज भारतीय तपासी संस्थांना मिळाले आहेत.