वर्ल्ड कपचा थरार,  गुरुजी, आधी मॅच, मग तुमचे कीर्तन; अखेर वर्ल्डकप जिंकण्याचा जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:18 AM2024-07-01T10:18:49+5:302024-07-01T10:19:10+5:30

बीएमएम अधिवेशन समाप्तीच्या दिशेने : समारोपात भेटणार क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि सौरभ नेत्रावळकर

American people from Mumbai-Pune, Nashik-Nagpur who gathered in San Jose in America were worried for World Cup Match | वर्ल्ड कपचा थरार,  गुरुजी, आधी मॅच, मग तुमचे कीर्तन; अखेर वर्ल्डकप जिंकण्याचा जल्लोष 

वर्ल्ड कपचा थरार,  गुरुजी, आधी मॅच, मग तुमचे कीर्तन; अखेर वर्ल्डकप जिंकण्याचा जल्लोष 

थेट अमेरिकेतून अपर्णा वेलणकर

सान होजे : तिकडे बार्बाडोसच्या  ब्रीजटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मैदानाबाहेर चेंडू फटकावत सुटले होते आणि इकडे अमेरिकेत सान होजेमध्ये जमलेली मुंबई-पुण्याची, नाशिक-नागपूरची अमेरिकन माणसे  काळीज मुठीत घेऊन काळजीत पडली होती. बीएमएम अधिवेशनात शनिवारची सकाळ उजाडली ती टेन्शन घेऊनच!  इथल्या  स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता भारताने अखेरीस वर्ल्ड कप जिंकल्याचा जल्लोष उसळला आणि बाकी सगळे विसरून ठिकठिकाणच्या स्क्रीन्सवर डोळे लावून बसलेल्या गर्दीच्या जीवात जीव आला. मग सुरु झाले खरे सेलिब्रेशन! 

एकीकडे गाणे बहरले आहे, दुसरीकडे नृत्य रंगले आहे. इकडे गंभीर चर्चासत्रे सुरु आहेत, तिकडे स्पर्धा लढवल्या जात आहेत. नाटकाला जाऊ की शास्त्रीय संगीताची मैफल ऐकू अशा गोड पेचात सापडलेले उपस्थित या लयलुटीने थकून शेवटी खूप दिवसांनी भेटलेल्या यारदोस्तांशी गप्पांचे अड्डे टाकून बसले. ‘ भाई, एक कविता हवी आहे’ मध्ये मुक्ता बर्वे थकलेल्या तरी प्रसन्न पुलंना आणि सुनीताबाईनाच  घेऊन आली, तिने लोकांना रडवले. सारंग साठ्येने पोट दुखेतो  हसवले. मीना नेरुरकरांचे प्रभात सिनेदर्शन, गोविंदगिरी महाराज आणि शरद पोंक्षेंची  व्याख्याने, कौशल इनामदारांची मैफल, स्थानिक मंडळींनी केलेले ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ हे नाटक  आणि एकाचवेळी समांतर सत्रांमध्ये सुरु असलेले अनेकानेक कार्यक्रम यांनी बहरलेला शनिवार अजय-अतुल यांनी एका उंचीवर नेला. खाण्यापिण्याची लयलूट अनुभवलेल्या उपस्थितांच्या पोटाबरोबरच  मनही तृप्त होऊन गेले!

संपली का हो मॅच? 
गौर गोपाल दास यांना ऐकण्यासाठी खचाखच भरलेला हॉल ‘आधी मॅच संपू दे’ म्हणून इतका  ताटकळला होता, की शेवटी तिथला स्क्रीन क्रिकेटच्या फीडशी जोडला गेला. मॅच जिंकल्यावर नाचून-गाऊन झाले आणि गौर गोपाल दास नावाचे हसरे, प्रसन्न गुरुजी आपल्या व्याख्यानाला उभे राहिले.  म्हणाले, अहो काय करू, मला असा उशीर आवडत नाही..पण एक तरुण मित्र इथे येतानाच मला म्हणाला, गुरुजी, आधी मॅच बघा बरं का, मग तुमचं कीर्तन ऐकायला येतोच!

Web Title: American people from Mumbai-Pune, Nashik-Nagpur who gathered in San Jose in America were worried for World Cup Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.