पाकिस्तानमध्ये एवढं मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:21 AM2024-10-06T09:21:34+5:302024-10-06T09:24:02+5:30
पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिकेने एक ॲडव्हायजरी जारी केली आहे.
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. अमेरिकन दूतावास आणि पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने शुक्रवारी आपल्या नागरिकांना ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
त्याचबरोबर अमेरिकन सरकारने आपल्या नागरिकांना कोणत्याही आंदोलनात सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे. ॲडव्हायजरीत पुढे म्हटले आहे की, अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाबाबत जागरूक असले पाहिजे.
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद १५-१६ ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाईल. कराची आणि इस्लामाबादमध्ये सुरक्षा राखण्यासाठी शाहबाज सरकारने शहरात लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्त्रायलने हिजबुल्लाह आणि हमासवर केलेल्या हल्ल्याबाबतही पाकिस्तानात निदर्शने होत आहेत. दहशतवादी संघटना आपल्या नागरिकांना लक्ष्य करू शकतात याची अमेरिकेला चिंता आहे.
हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर हिजबुल्लाहचा नवा प्रमुख हाशेम सैफुद्दीन हा सुद्धा इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. सैफुद्दीनला मारण्यासाठी इस्रायलने दक्षिण बेरूतमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सैफुद्दीन एका बहुमजली इमारतीखाली बांधलेल्या बंकरमध्ये आपल्या कमांडर्ससोबत बैठक घेत होता.
दरम्यान, लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याबद्दल सांगायचे झाल्यास २७ सप्टेंबर रोजी इस्रायलने बेरूतसह हिजबुल्लाहच्या सर्व ठिकाणांवर बॉम्बफेक केली. यावेळी इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्रायलने दावा करण्यात आली की, त्यांनी हिजबुल्लाह संघटना जवळजवळ पूर्णपणे नष्ट केली आहे. हिजबुल्लाहचा क्षेपणास्त्र साठा नष्ट करण्याचा दावाही इस्रायलने केला आहे. यानंतर हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह आणि त्याची मुलगी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची बातमी समोर आली. याबाबत हिजबुल्लाहकडून दुजोरा देण्यात आला नव्हता.