अमेरिकेचा २,४५० किलोचा उपग्रह पृथ्वीवर कोसळणार; १९८४ मध्ये पाठवलेले अंतराळात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 08:53 AM2023-01-09T08:53:45+5:302023-01-09T08:54:12+5:30
एरोस्पेस कंपनीच्या अनुमानानुसार सोमवारी सकाळपर्यंत हा उपग्रह पृथ्वीवर कोसळेल.
वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाचा ३८ वर्षे जुना ‘इआरबीएस’ हा उपग्रह पृथ्वीवर कोसळणार आहे. मात्र, त्याचा मलबा कोणावर पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. पृथ्वीच्या वातावरणात येण्यापूर्वीच त्याचा बहुतांश भाग नष्ट झालेला असेल. मात्र, त्याचे काही अवशेष पृथ्वीवर कोसळू शकतात, असे नासाने सांगितले.
एरोस्पेस कंपनीच्या अनुमानानुसार सोमवारी सकाळपर्यंत हा उपग्रह पृथ्वीवर कोसळेल. या उपग्रहाचे वजन २४५० किलो आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला अंतराळवीर सेला राइड यांनी स्पेस शटल चॅलेंजरच्या रोबोटिक हाताद्वारे इआरबीएसचे प्रक्षेपण केले होते.
१९८४ मध्ये प्रक्षेपण
इआरबीएस म्हणजेच अर्थ रेडिएशन बजेट उपग्रह, हा १९८४ मध्ये अंतराळात पाठविण्यात आला होता. या उपग्रहाच्या माध्यमातून सूर्याची किती ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते व त्या तुलनेत पृथ्वीच्या वातावरणाशी टक्कर झाल्यावर किती परत जाते, हे मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपग्रहाने २ वर्षांऐवजी २००५ पर्यंत काम केले.