अमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा'
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 2, 2020 05:01 PM2020-12-02T17:01:25+5:302020-12-02T17:11:13+5:30
अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती.
वॉशिंग्टन - पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनदरम्यानचा तणाव अद्यापही कमी झालेला नाही. अनेक वेळा चर्चा होऊनही हा वाद अद्याप संपलेला नाही. या दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर समोरा-समोर तैनात आहे. भारत आणि चीन यांच्यातील या तणावातच अमेरिकेकडून एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकेने यावर्षीच 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. यामुळे चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती. मात्र, गलवान हिंसक चकमकीचे कारण या अहवालात स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेले नाही. पण चीनने आपल्या सैन्यासाठी स्ट्रॅटेजिक रूट तयार करण्याच्या हेतूने ही चकमक घडवून आणली, असा अंदाज लावण्यात आला आहे.
चीनने भारतासह आपल्या ज्या शेजारील देशांचे अमेरिकेसोबत चांगले ट्रेड संबंध आहेत, अशा देशांना टार्गेट केले आहे. या अहवालात चीनविरोधात कठोर पावले उचलने आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली आहे. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर ज्यो बायडन यांच्यसमोर हे एक मोठे आव्हान असेल. एवढेच नाही, तर चीनची पाकिस्तानच्या डिफेंस स्पेसमधील दखलही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचेही या अहवालात म्हणण्यता आले आहे.
भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 15 जूनला गलवान खोऱ्यात हिंसक झडप झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. यात मोठ्या संख्येने चिनी सैनिकही मारले गेले होते. मात्र, चीन यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देत नाही. गलवान संघर्षापासूनच दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. हा वाद सोडविण्यासाठी अनेक वेळा उभय देशांत चर्चाही झाल्या आहेत. मात्र, सहमती झाल्यानंतरही चीन आपल्या विस्तारवादी नीतीने धोकेबाजी करत आहे.