‘आप’च्या विजयावर अमेरिकेचे नो कॉमेंट
By admin | Published: February 12, 2015 12:01 AM2015-02-12T00:01:51+5:302015-02-12T00:01:51+5:30
मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या पराभवावर चहूकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.
वॉशिंग्टन : मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या पराभवावर चहूकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. अमेरिकन अधिका-यांनी मात्र या निकालावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले; पण अमेरिकेतील प्रसारमाध्यमे मात्र आपली भूमिका रोखठोकपणे मांडत असून, न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीयमध्ये ‘आप’चा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे, असे स्पष्ट म्हटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी राजकीय उंची गाठली; पण घरगुती राजकारणात मात्र त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली, असे या संपादकीय लेखात न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. गेल्यावर्षी मोदी लाटेमुळे भाजपने संपूर्ण देशात आपला प्रभाव जमविला होता.
यामुळे मोदी व भाजपचे नेते यांच्याभोवती वलय तयार झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाल्याने अपराजित अशी प्रतिमा निर्माण करण्यातही भाजपला यश मिळाले; पण भाजपची ही यशस्वी घोडदौड ‘आप’ने तितकाच प्रभावी विजय मिळवून रोखली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी मात्र दिल्ली निवडणूक हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत चर्चा गुंडाळली. (वृत्तसंस्था)