अमेरिकेचा तो निर्णय म्हणजे मूर्खपणा, हिजबुल म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनची बडबड
By admin | Published: July 1, 2017 09:32 PM2017-07-01T21:32:53+5:302017-07-01T21:32:53+5:30
हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतरही त्याचा गर्विष्ठपणा कायम आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतरही त्याचा गर्विष्ठपणा कायम आहे. अमेरिकेनं सय्यद सलाहुद्दीनला दहशतवादी म्हणून घोषित केल्याच्या कारवाईचा निषेध करत त्यानं सांगितले की, काश्मीर मुद्यावर सशस्त्र संघर्षाला आपलं समर्थन देणं कायम राहणार. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाद्वारे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णयाला मूर्खपणा असल्याची वायफळ बडबड सलाहुद्दीननं केली आहे.
पुढे तो असंही म्हणाला की, अमेरिकेच्या दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली ही भेट होती. पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये सलाहुद्दीननं पत्रकार परिषद घेत म्हटले की, मला दहशतवादी म्हणून घोषिक करण्यासंदर्भात पुरावा म्हणून एका घटनेचा उल्लेखही करू शकत नाही. या मूर्खपणाच्या निर्णयामुळे आमचा विश्वासाला तडा जाणार नाही. आम्ही काश्मीर मुद्यावर जिहाद सुरू ठेवणार.
हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील शिखर बैठकीपूर्वीच ही घोषणा करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली होती. सलाहुद्दीनने भारत-पाक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत या हल्ल्याचा संबंध जोडू नये, असेही स्पष्ट केले होते. आम्ही भारताच्या लष्करी संस्थांना लक्ष्य बनविले होते. पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरू ठेवण्याचाच एक भाग होता, असे सलाहुद्दीन याने पाकिस्तानातील वजूद या उर्दू न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
तसेच काश्मीर पाकिस्तानचाच भाग असल्याचं सांगत सलाहुद्दीन याने शरीफ यांच्या काश्मीर धोरणाविरोधात भूमिका मांडली होती. काश्मीरमधील दबलेल्या घटकांच्या भावना आणि आकांक्षा पाहता पाकिस्तान हा जबाबदार घटक ठरतो. तुम्ही बळी गेला त्याची आणि खुन्याच्या मित्राची वकिली एकाच वेळी करू शकत नाही. भारत-पाक चर्चा बंद पाडण्यासाठी पठाणकोट हल्ल्याचा कट रचण्यात आला हा समज पूर्णपणे चुकीचा होता. चर्चेच्या दीडशे फेऱ्या वांझोट्या ठरल्या आहेत, असे तो म्हणाला होता.