अमेरिकेला आंब्याची निर्यात दीडपट राहणार
By admin | Published: May 16, 2014 05:01 AM2014-05-16T05:01:39+5:302014-05-16T05:01:39+5:30
युरोपातील बंदीच्या विरुद्ध यंदा भारतातून अमेरिकेसाठी ४०० टन आंब्याची निर्यात होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४२ टक्क्यांनी यात वाढ नोंदली जाईल.
नवी दिल्ली : युरोपातील बंदीच्या विरुद्ध यंदा भारतातून अमेरिकेसाठी ४०० टन आंब्याची निर्यात होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४२ टक्क्यांनी यात वाढ नोंदली जाईल. कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडने सांगितले की, यंदा अमेरिकेतून आंब्याला चांगली मागणी मिळेल. गेल्या वर्षी भारतातून २८१ टन आंब्याची निर्यात अमेरिकेला झाली होती. यातुलनेत अमेरिकेला सुमारे ४०० टन आंब्याची निर्यात होईल. चालू महिन्यापासूनच आंबा निर्यातीस प्रारंभ झाला असून १० दिवसांतच ५० टन माल अमेरिकेला गेला आहे, अशी माहिती अपेडच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. यंदा प्रामुख्याने ‘हापूस’ आणि ‘केशर’ आंब्याची निर्यात होत आहे. या अधिकार्याने पुढे सांगितले की, आगामी दिवसांत अमेरिकेसाठी आंबा निर्यातीत तेजी येईल. देशाच्या विविध भागांतून ही निर्यात होईल. दशहरी, लंगडा आणि चौसा जातीच्या आंब्याची गुणवत्ता आणि पुरवठ्यावर अमेरिकेला होणार्या निर्यातीची वाढ अवलंबून आहे. २00७ मध्ये हिरवा कंदिल अमेरिकेने २००७ मध्ये भारतातून आंबा निर्यातीस हिरवा कंदिल दाखवला होता. किरणोत्सर्गी तपासणी करून अमेरिकेला आंबा पाठविला जातो. विकिरण प्रक्रियेमुळे आळ्याचे संक्रमण नष्ट होते, तसेच फळाचे टिकाऊपणही वाढत जाते. उल्लेखनीय म्हणजे, युरोपीय संघाने भारताच्या हापूस आंब्यात आळ्यांचे संक्रमण झाल्याचा दावा करत याच्या आयातीवर अस्थायी बंदी लादली आहे. दरम्यान, भारताने ही बंदी गैरलागू असल्याचा आरोप करत ही मागे घेण्याची मागणी केली आहे. देशात यंदा आंबा उत्पादन सुमारे १६ लाख टन होईल, असा अंदाज आहे. २०१४ मध्ये आंबा निर्यात ६०,००० टनापर्यंत जाणे अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)