अमेरिकेतील वृद्ध महिला काळाच्या पडद्याआड
By admin | Published: April 7, 2015 11:09 PM2015-04-07T23:09:59+5:302015-04-07T23:09:59+5:30
जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचा किताब मिळाल्यानंतर अवघ्या सात दिवसात जगातील दुसऱ्या वयोवृद्ध महिलेचे निधन झाले.
वॉशिंग्टन : जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचा किताब मिळाल्यानंतर अवघ्या सात दिवसात जगातील दुसऱ्या वयोवृद्ध महिलेचे निधन झाले. गर्टरुड विव्हर यांचे वयाच्या ११६ व्या वर्षी अमेरिकेतील अर्कान्सास येथे निधन झाले. विव्हर न्यूमोनियाने पीडित होत्या.
गेल्या बुधवारी जगातील सर्वाधिक वृद्ध जपानी महिला मिसाओ ओकावा यांचे निधन झाले होते. त्यानंतर सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्तीचा किताब गर्टरुड विव्हर यांना देण्यात आला. गर्टरुड विव्हर गेल्या शनिवारी आजारी पडल्या होता. सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र जो विव्हर असून तो मंगळवारी ९४ वर्षांचा झाला.
वॉशिंग्टन पोस्टने पुनर्वास केंद्राच्या अधिकारी कॅथी लेंग्ली यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिला आहोत हे गर्टरुड यांना माहीत होते.
१८९८ साली जन्म
आपल्या या विशिष्ट स्थानाचा आनंद त्या पुरेपूर घेत होत्या. प्रत्येक फोनकॉल, प्रत्येक पत्रातील मजकूर त्या उत्सुकतेने जाणून घेत असत. गर्टरुडचा जन्म १८९८ साली झाला होता. आपल्या सहा भाऊ-बहिणीत त्या सर्वात लहान होत्या. त्यांचे वडील शेतकरी होते. (वृत्तसंस्था)