अमेरिकेची लढाई इस्लामविरुद्ध नाही
By admin | Published: February 20, 2015 02:01 AM2015-02-20T02:01:47+5:302015-02-20T02:01:47+5:30
अमेरिकेची लढाई ही इस्लामविरुद्ध नाही, तर ती धर्माची विकृती करणाऱ्यांविरोधात असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली.
ओबामांची स्पष्टोक्ती : धर्माची विकृती करणाऱ्यांना आमचा विरोध
वॉशिंग्टन : अमेरिकेची लढाई ही इस्लामविरुद्ध नाही, तर ती धर्माची विकृती करणाऱ्यांविरोधात असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली. तसेच इसिस आणि अल काईदा यासारख्या दहशतवादी संघटना म्हणजे कट्टरवादी विचारधारेला जोरकस विरोध करणाऱ्या अब्जावधी मुस्लिमांचा आवाज नाही, असे ते म्हणाले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ‘हिंसक कट्टरवादविरोधातील लढा’ या विषयावर व्हाईट हाऊस शिखर परिषदेत बोलताना सांगितले की, ‘आमची लढाई इस्लामशी नाही. इस्लामची विकृती करणाऱ्यांविरोधात आम्ही लढा पुकारला आहे. इसिस आणि अल काईदासारख्या संघटना स्वत:ची भूमिका योग्य असल्याचे गळा काढून सांगत आहेत. ते स्वत:ला धार्मिक नेता आणि इस्लामचे रक्षण करणारे पवित्र योद्धे असल्याचा जगाला भास करून देण्यासाठी खटाटोप करत आहेत.’ इसिस स्वत:ची इस्लामिक स्टेट म्हणून संभावना करत आहे आणि अमेरिका व पाश्चात्त्य देशांची लढाई इस्लामविरोधात असल्याचा दुष्प्रचार करत सुटले आहेत, असेही ओबामा म्हणाले.
पाश्चात्त्य आणि इस्लाम वा आधुनिक जीवन आणि इस्लाम हे परस्परविरोधी आहेत, ही दहशतवाद्यांनी पसरविलेली बाब मुस्लिम समुदायाबाहेरील लोकांनी फेटाळून लावण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्ही या बाबी फेटाळून लावल्या पाहिजेत. कारण त्या पूर्णत: खोट्या आहेत आणि धार्मिकदृष्ट्या दहशतवाद्यांना खरे ठरविण्याचीही चूक आम्ही करता कामा नये. ते धार्मिक नेते नाहीत, तर दहशतवादी आहेत, अशा प्रखर शब्दांत ओबामा यांनी हल्ला चढविला. तीनदिवसीय शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. (वृत्तसंस्था)
माझ्यासारखे लोक इसिससारख्या दहशतवादी संघटना इस्लामचे प्रतिनिधित्व करतात, ही धारणा फेटाळून लावतात.
मुस्लिम नेत्यांनीही ही धारणा निराधार असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. इसिस आणि अल काईदा यासारख्या दहशतवादी संघटना जागतिक आव्हान आहे. दहशतवादाविरोधात सर्वच देशांनी एकजूट होऊन लढणे गरजेचे आहे.