कर्जबाजारी पाकिस्तान जिन्नांची ओळख ठेवणार तारण; इम्रान खान घेणार ५०० अब्ज रूपयांचं कर्ज
By जयदीप दाभोळकर | Published: January 25, 2021 11:44 AM2021-01-25T11:44:01+5:302021-01-25T11:46:59+5:30
७५९ एकर परिसरात पसरलेलं हे इस्लामाबादमधील सर्वात मोठं उद्यान आहे.
कर्जाच्या ओझ्याकडे दबलेला पाकिस्तान आता पुन्हा एकदा कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी इम्रान खान सरकार पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वात मोठं उद्यान तारण ठेवण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. हे पार्क इस्लामाबादच्या F-9 सेक्टरमध्ये आहे. हे उद्यान तारण ठेवल्यामुळे पाकिस्तानला ५०० अब्ज रूपयांचं कर्ज मिळणार असल्याची आशा इम्रान खान सरकारला आहे. हे उद्यान तारण ठेवण्याचा प्रस्ताव मंगळवारी पाकिस्तान सरकारच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. या उद्यानाचं नाव 'फातिमा जिन्ना पार्क' आहे. त्या पाकिस्तानचे संस्थापन मोहम्मद अली जिन्ना यांच्या बहिण होत्या.
पाकिस्तानचं वृत्तपत्र डॉननं दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी ऑनलाईन पद्धतीनं ही बैठक पार पडणार आहे. त्यावेळी या प्रस्तावावारदेखील चर्चा करण्यात येईल. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान इस्लामाबाद येथील फातिमा जिन्ना पार्क तारण ठेवणार आहे. याद्वारे पाकिस्तानला ५०० अब्ज रूपयांचं कर्ज मिळणार असल्याचं डॉननं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
इस्लामाबादच्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीनं यासंबंधी यापूर्वीच नो ऑबजेक्शन सर्टिफिकेट मिळवलं आहे. यापूर्वी पाकिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या सरकारांनी आपल्या निरनिराळ्या संस्था आणि इमारती तारण ठेवल्या होत्या. परंतु यावेळी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मोहम्मद अली जिन्ना यांच्या बहिणीच्या नावावर ठेवण्यात आलेलं उद्यानच तारण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे उद्यान ७५९ एकर परिसरात पसरलं आहे. हा परिसर पाकिस्तानातील सर्वाक हिरव्यागार मानल्या जाणाऱ्या परिसरांपैकी एक आहे.
पाकिस्तान सातत्यानं अन्य देशांकडून कर्ज घेत आहे. सत्तेत येण्यापूर्वी इम्रान खान यांनी पाकिस्तान घेत असलेली लोन सिस्टम बंद करणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु गंभीर अर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आता दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. याव्यतिरिक्त कोरोना महासाथीनंही पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा पार मोडला आहे. आपली अर्थव्यवस्था सुरू ठेवण्यासाठी पाकिस्ताननं पुन्हा एकदा ८७,५६,५८,००,०० रूपयांचं नवं कर्ज घेतलं होतं. कर्जाच्या या रकमेसोबतच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये पाकिस्ताननं आतापर्यंत ५.७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४,१६,०१,७३,५०,००० रूपयांची उधारी घेतली आहे.
सौदी, युएईनं कर्जाची रक्कम मागितली
इम्रान खान यांच्या हाती सत्ता आल्यानंतरही पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची ढासळत चालली आहे. यासाठी इम्रान खान यांनी यापूर्वीच्या सरकारांना दोषी मानलं आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगार देण्यासाठी इम्रान खान सरकारला घाम गाळावा लागत आहे. यातच पाकिस्तानला कर्ज पुरवलेला देश सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी आपल्या कर्जाची रक्कमही परत मागितली आहे.