युद्धाच्या आक्रोशात गर्भवतीने दिली गुडन्यूज; ५ किमी चालून ४ बाळांना जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:50 PM2023-12-29T12:50:52+5:302023-12-29T12:52:16+5:30
येथे तिने ४ बाळांना जन्म दिला. त्यामध्ये, २ मुले व २ मुलींचा समावेश आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात गत काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका तेथील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. युद्धजन्य फिलिस्तानी क्षेत्रातील हिंसक वातावरणातही एक आनंद देणारी बातमी समोर आली आहे. येथील भूमीत एका गर्भवती महिलेने ४ बाळांना जन्म दिला. विशेष म्हणजे महिला स्वत: ५ किमी चालून रुग्णालयात पोहोचली. येथे तिने ४ बाळांना जन्म दिला. त्यामध्ये, २ मुले व २ मुलींचा समावेश आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर ही महिला आपल्या तीन मुलांसह बेत हानून येथील आपलं घर सोडून चालतच सुरक्षित जागा पाहून एकटी राहू लागली. ही महिला गर्भवती होती, जेव्हा बाळ जन्माला यायचा दिवस आला, त्यावेळी महिलेने ५ किमी पायी चालून रुग्णालय गाठले. रुग्णालयात तिने ४ बाळांना जन्म दिला. बाळासह आईची प्रकृती उत्तम आहे.
महिलेचे नाव इमान असून रुग्णालयापर्यातचा हा प्रवास दूर आणि त्रासदायक होता, असे तिने म्हटले. १८ डिसेंबर रोजी महिलेने दोन मुलं आणि २ मुलींना जन्म दिला. मात्र, तिला तात्काळ रुग्णालयातून बाहेर पडावे लागले. महिलेला रुग्णालय प्रशासनाने चिमुकल्या बाळांसह रुग्णालय सोडण्यास सांगितले होते. तिच्या ४ पैकी एका बाळाची प्रकृती थोडी चिंताजनक होती, तरीही युद्धजन्य परिस्थितीचं कारण देत इमानला रुग्णालय सोडण्यास सांगण्यात आले. कारण, रुग्णालयात दाखल होणाऱ्या जखमी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती.
संयुक्त राष्ट्राकडून सातत्याने इस्रायलकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तसेच, डच मंत्र्याची गाझासाठी ह्युमन कंवेनर म्हणून घोषणाही केली. संयुक्त राष्ट्राने ट्विटरवर ट्विट करुन इस्रायलकडून होत असलेल्या बॉम्ब हल्ल्यावर चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, गेल्या ७ ऑक्टोबर रोजी हमासने सीमारेषा ओलांडून इस्रायल शहरातील १२०० नागरिकांची हत्या केली होती. तसेच, २४० जणांना कैदी बनवले होते. त्यामुळे, इस्रायलने त्याचदिवशी गाझा पट्टीवर बॉम्बहल्ले सुरू केले. या बॉम्बहल्ल्यात आत्तापर्यंत २१,००० फिलिस्तानी ठार झाले आहेत.