'...तर अमेरिकेतील मध्यमवर्ग जाईल गरिबीच्या खाईत, वांशिक भेदाचा सामना करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 03:25 PM2020-04-18T15:25:48+5:302020-04-18T15:42:50+5:30
सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत.
न्यू यॉर्क : कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक हाहाकार घातला आहे. जगाचा विचार करता, कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे मरणारांची सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतच आहे. महासत्ता अमेरिका कोरोनापुढे हतबल झाल्यासारखी दिसत आहे. असे असतानाच आता, कोरोना व्हायरसमुळे कोट्यवधी मध्यमवर्गिय नागरिकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवायचे असेल, तर अमेरिकेला तत्काळ महत्वपूर्ण पावले उचलावी लागतील. असे झाले नाही, तर अमेरिकेच्या अनेक भागांना गरिबीचा सामाना करावा लागू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत फिलिप एल्स्टन यांनी दिला आहे.
अमेरिकेतील मध्यमवर्गाला कोरोनाचा सर्वाधिक फटका -
एल्स्टन म्हणाले, ‘सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत.
घरभाडे देणेही अवघड -
अमेरिकेत गेल्या चार आठवड्यांत 2.2 कोटी लोकांनी सरकारकडे बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेतील काही अर्थतज्ज्ञांनी देशातील 4.7 कोटी लोकांची नोकरी जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेत भाड्याने राहत असलेल्या जवळपास एकतृतियांश लोकांना एप्रिल महिन्याचे भाडे वेळेवर देता आलेले नाही.
गरिबांना अधिक धोका -
येथील गरीब लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. ते केवळ अशाच नोकऱ्या करू शकतात, जेथे आजारांच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिका आहे. ते गर्दीच्या ठिकाणी आणि अशा भागातच राहू शकतात, जेथे हवा प्रदूषण अधिक आहे. येथील वांशिक भेदभावाचा सामना करणाऱ्या समुदायाला कोरोनाचा अधिक धोका आहे. अशा नागरिकांचाच येथे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. असे असतानाही, अनेकांना सरकारी मदत पोहोचत नाहीये आणि एवढ्यामोठ्या संकटात ती अत्यंत तुटपुंजी आहे, असे एल्स्टन यांनी म्हटले आहे.