Amruallah Saleh: 'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 02:47 PM2021-08-19T14:47:37+5:302021-08-19T14:56:52+5:30
Amruallah Saleh: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे.
Amruallah Saleh: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानवरतालिबानी संकट कोसळलेलं असताना राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. तर उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह साहेल यांनी मात्र तालिबान्यांना घाबरून देश सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. ते पंजशीरमध्ये आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील बहुतेक प्रांत काबिज केले आहेत. पण पंजशीर प्रांत काबीज करता आलेला नाही. यातच सालेह यांनी तालिबान आणि पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
"पाकिस्तानसाठी अफगाणिस्तान देश इतका मोठा आहे की ते कधीच देशाला गिळंकृत करू शकत नाहीत. तसंच तालिबान्यांना शासन लागू करण्यासाठी अफगाणिस्तान देश खूप मोठा आहे. त्यांना ते जमणार नाही", असं म्हटलं आहे.
याला म्हणतात हिंमत! अफगाणिस्तानाचा मजबूत बालेकिल्ला; इथे घुसायला तालिबानही घाबरतो
अमरुल्लाह सालेह सध्या अफगाणिस्तानातच असून तालिबान विरोधात समर्थन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा त्यांनी सन्मान केला आहे. "जगानं देशातील कायद्यांचं आणि शासनाचा सन्मान केला पाहिजे. हिंसेचा नव्हे. अफगाणिस्तान देश इतका मोठा आहे की पाकिस्तान कधीच गिळंकृत करू शकणार नाही. तर तालिबान कधीच त्यावर राज्य करू शकणार नाही. त्यामुळे तालिबान आणि दहशतवादी संघटनांसमोर एका देशाला गुडगे टेकावे लागतील असा पायंडा इतिहासात पाडू देऊ नका", असं आवाहन सालेह यांनी संपूर्ण जगाला केलं आहे.
१७ ऑगस्ट रोजी काळजीवाहू राष्ट्रपतीची केली घोषणा
तालिबाननं काबुलवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी साहेल यांनी युद्धग्रस्त प्रांताचा काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून स्वत:च्या नावाची घोषणा केली. "मी आता देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती असून हा निर्णय मी कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेला आहे. तत्कालीन राष्ट्रपतीच्या अनुपस्सथितीत उपराष्ट्रपती म्हणून देशाला सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे", असं सालेह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सालेह यांनी तालिबान्यांना अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचं जाहीर केलं आणि पाकिस्तानवरही हल्लाबोल केला आहे.