"मला मूर्ख बनवणे आता थांबवा"; जो बायडेन इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंवर चिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 10:42 AM2024-08-04T10:42:54+5:302024-08-04T10:48:21+5:30
चिडलेल्या जो बायडेन यांनी मध्यपूर्व तणावाच्या दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सुनावले आहे
US-Israel: इस्रायल - पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान, हमारच्या बड्या नेत्याची हत्या झाल्याने दोन्ही देशांमधील वाद आणखी चिघळला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येनंतर आशियाच्या पश्चिमेकडील देशांमध्ये संघर्ष वाढण्याची भीती आहे. अशातच हानिया यांच्या हत्येनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. मात्र या संवादादरम्यान बायडेन यांनी नेत्यान्याहू यांना सुनावले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
हानिया यांच्या मृत्यूसाठी हमास आणि इराण या दोन्ही देशांनी इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादने योजना आखून हानिया यांची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, इस्रायलने सगळे आरोप फेटाळत या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी झालेल्या संभाषणात हानिया यांच्या हत्याप्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
इस्माईल हानिया यांच्या हत्येनंतर जो बायडेन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यावर संतापले आहेत. 'मला मूर्ख बनवणे थांबवा आणि राष्ट्राध्यक्षांना हलक्यात घेऊ नका,' या शब्दात बायडेन यांनी नेत्यान्याहू यांना सुनावलं. मिळालेल्या माहितीनुसार, नेत्यान्याहू म्हणाले होते की, ओलीसांची सुटका करण्यासाठी ते हमासशी चर्चा पुढे नेत आहेत आणि लवकरच चर्चा सुरू करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवणार आहे. मात्र परिस्थिती वेगळीच असून अद्यापही हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे बायडेन यांनी संपात व्यक्त केला.
अमेरिका आणि इजिप्तसह अनेक देश गाझामध्ये युद्धबंदीचे समर्थन करत होते. गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच इराणमध्ये इस्माईल हनिया यांची हत्या इस्रायलने केल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही देशांसह इराणमध्येही तणाव वाढला. आता इराण आणि इस्रायल हे युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले. इराणने याआधीही इस्रायलवर हल्ला केला आहे. तरीही अमेरिकेने तेव्हा पूर्ण पाठिंबा दिला होता आणि वाटेत अनेक क्षेपणास्त्रे नष्ट केली होती.
दरम्यान, पश्चिम आशियामध्ये आधीच सुरू असलेल्या संघर्षात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण इराण आणि तेहरान समर्थित गटांनी त्यांच्या अनेक नेत्यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी १३-१४ एप्रिलच्या रात्री इस्रायलवर इराणचे अभूतपूर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांना एकत्रित आणलं होतं.