पुलांची माहिती देणारे ॲप! अमेरिकेतील महत्त्वाचे संशोधन, हादऱ्यांची माहिती मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:07 AM2022-11-08T08:07:16+5:302022-11-08T08:07:32+5:30
जगभरात पुलांसंदर्भातील दुर्घटना सातत्याने घडत असतात. नुकताच गुजरातमध्ये मोरबी येथील झुलता पूल कोसळून सुमारे १३५ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी आहे.
वॉशिंग्टन :
जगभरात पुलांसंदर्भातील दुर्घटना सातत्याने घडत असतात. नुकताच गुजरातमध्ये मोरबी येथील झुलता पूल कोसळून सुमारे १३५ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी आहे. आता जगातील कोणताही पूल व्यवस्थित आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी स्मार्टफोन ॲप्लिकेशन असू शकते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
नवीन अभ्यासानुसार वाहनांमध्ये ठेवलेल्या विशेष सॉफ्टवेअरसह सुसज्ज मोबाइल फोन पूल ओलांडताना उपयुक्त संरचनात्मक माहिती गोळा करू शकतात.
अभ्यासक कार्लो रत्ती म्हणतात, “पुलांच्या संरचनात्मक आरोग्याविषयी स्मार्टफोनने मिळविलेली माहिती, डेटामधून काढली जाऊ शकते. हे संशोधन काही प्रमाणात येथील गोल्डन गेट पुलावरच करण्यात आले. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधकांचा समावेश असलेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की, पुलाचे सेन्सर ज्याप्रमाणे हादऱ्यांचा डेटा संकलित करतात, त्याचप्रमाणे मोबाइल ॲपही ही माहिती मिळवू शकते.’’
पुलांचे आयुष्य ३० टक्के वाढू शकते...
मोबाइल ॲपच्या अशा सततच्या देखरेखीतून मिळालेल्या डेटामुळे पुलाचे आयुष्य १६ ते ३० टक्के वाढू शकते.
स्मार्टफोनद्वारे संकलित केलेला प्रचंड आणि स्वस्त डेटा विद्यमान वाहतूक पायाभूत सुविधांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.
अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी पुलावरून जाणाऱ्या वाहनांमध्ये ठेवण्यासाठी अँड्रॉइड-आधारित मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. संशोधकांनी मिळविलेला डेटा आशादायक आणि अचूक आहे.