निज्जरशी संबंधीत पाकिस्तानी उद्योजकाला कॅनडात जाळण्याचा प्रयत्न; गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 11:34 AM2024-08-04T11:34:00+5:302024-08-04T11:34:11+5:30
कॅनडा पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. राहत राव हा गंभीर जखमी झाला आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूनंतर आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी उद्योजकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. अज्ञात हल्लेखोराने राहत राव याला आग लावली होती. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात त्याचा फॉरेक्सचा व्यवसाय आहे.
कॅनडा पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. राहत राव हा गंभीर जखमी झाला आहे. खलिस्तानी मुव्हमेंटमध्ये त्याचा मोठा हात आहे. निज्जरच्या हत्येनंतर कॅनडात झालेल्या अनेक आंदोलनात राव याचा सक्रीय सहभाग होता. राव हा पाकिस्तानी आयएसआयचा एजंट असल्याचे बोलले जात होते. परंतू तो एजंट नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
भारताने निज्जरला २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. त्याच्या हत्येमागे भारताचाच हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. निज्जरची गेल्या जूनमध्ये ब्रिटश कोलंबियातील एका गुरुद्वारा बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचा हवाला देत भारतावर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने देखील आणखी एक खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटावरून भारतीय अधिकाऱ्याला पकडल्याचा दावा केला होता. यामुळे कॅनडाला आणखी बळ मिळाले आहे.
भारताने अमेरिका आणि कॅनडाच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत असल्याचे म्हटले होते. अमेरिकेने पन्नू प्रकरणात काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, परंतु कॅनडाने तसे काहीच दिलेले नाहीय. फक्त हवेत आरोप केले आहेत. निज्जरची हत्या करण्यासाठी सहा लोक दोन वाहनांतून आले होते, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला होता.