पन्नू हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचला! अमेरिकेचा आरोप; हल्लेखोरांना सुपारी दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:57 PM2024-10-19T14:57:02+5:302024-10-19T14:57:12+5:30
न्यूयॉर्क शहरातील न्यायालयात यासंदर्भात सरकारने युक्तिवादात हा दावा केला. पन्नू याची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांना सुपारी देण्याबाबत तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी विकास यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.
वॉशिंग्टन/न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असताना खलिस्तानवादी गुरुपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येचा कट आखल्याचा आरोप त्या देशाने भारताच्या एका माजी अधिकाऱ्यावर ठेवला आहे. विकास यादव असे त्याचे नाव असून, तो भारताच्या कॅबिनेट सचिवालयात कार्यरत होता. त्या सचिवालयाचा भारताच्या रॉ या गुप्तहेर संघटनेशी निकटचा संबंध आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
न्यूयॉर्क शहरातील न्यायालयात यासंदर्भात सरकारने युक्तिवादात हा दावा केला. पन्नू याची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांना सुपारी देण्याबाबत तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी विकास यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. पण हत्येचा कट अयशस्वी ठरला असे अमेरिकेने म्हटले. पन्नूच्या हत्येच्या कटात सहभागी आणखी एक आरोपी निखिल गुप्ता याला झेक रिपब्लिक या देशात अटक करण्यात आली. अमेरिकेच्या भूमीवर आमच्या नागरिकांच्या हत्येचा कट आखून कारवाया करण्याचे प्रयत्न खपवून घेता कामा नये, असे ॲटर्नी जनरल मेरिक बी. गारलँड यांनी म्हटले आहे.
हत्या कटात सहभागाचा भारताकडून इन्कार
- खलिस्तानवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याची अमेरिकेत हत्या करण्याच्या कटात आमचा काहीही सहभाग नाही असे भारताने ठामपणे अमेरिकेला सांगितले आहे.
- याप्रकरणी चौकशी करण्यासाठी भारताने एक समिती नेमली आहे. भारत देत असलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे.