बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:39 AM2024-08-12T06:39:14+5:302024-08-12T06:41:10+5:30

न दिलेले भाषण आले उजेडात

An island in Bangladesh not given, power lost Sheikh Hasina alleges US conspiracy | बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप

बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप

नवी दिल्ली/ढाका : बांगलादेशमधील अचानक घडलेल्या सत्तांतरामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात असताना सत्ता गमावलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या सत्ताबदलामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करून खळबळ उडवली आहे. सेंट मार्टिन बेटाचे सार्वभौमत्व सोडले असते आणि अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर सत्ता गाजवण्याची परवानगी दिली असती तर मी माझी सत्ता वाचवू शकले असते, असे त्यांनी सत्ता सोडण्यापूर्वी न केलेल्या शेवटच्या भाषणात म्हटल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यापूर्वी आणि ढाका येथील निवासस्थानातून पलायन करण्यापूर्वी शेख हसीना यांना राष्ट्राला संबोधित करायचे होते; परंतु आंदोलक त्यांच्या दारात पोहोचले आणि देशाच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्यांना निघून जाण्याचा सल्ला दिल्याने ते भाषण कधीच केले गेले नाही.

सेंट मार्टिन या बेटाचे क्षेत्रफळ फक्त ३ चौरस किलोमीटर आहे आणि ते बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात स्थित आहे. हा बांगलादेशचा सर्वांत दक्षिणेकडील भाग आहे.

मला आणखी मृतदेहांच्या अंत्ययात्रा बघायला लागू नये म्हणून मी राजीनामा दिला. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर सत्तेत यायचे होते, पण मी ते होऊ दिले नाही.
- शेख हसीना, माजी पंतप्रधान, बांगलादेश

धग कायम; आंदोलकांचा आता जवानांवर हल्ला

बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले असले तरी हिंसाचार थांबायला तयार नाही. गोपालगंज सदर उपजिल्ह्यामधील गोपीनाथपूर येथे शनिवारी लष्कराच्या दोन गस्ती पथकांवर आंदोलकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने किमान नऊ जवान जखमी झाले. शस्त्रे आणि विटांनी झालेल्या हल्ल्यात तीन अधिकारी, एक कनिष्ठ अधिकारी आणि पाच जवान जखमी झाले.

आंदोलकांनी गोपालगंज-ढाका महामार्ग रोखून धरल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने लष्कराचे दोन पथक घटनास्थळी गेले. त्यांच्यावर निदर्शकांनी विटांचा भडिमार केला आणि  शस्त्रांनी हल्ला केला. 

भारताच्या सीमेवर आणि बांगलादेशात आणखी काय झाले? 

  • घुसखोरी करणाऱ्या ११ बांगलादेशींना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडले.
  • खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या किंवा प्रसारित केल्यास संबंधित प्रसारमाध्यमांवर बंदी घातली जाईल, असा सज्जड इशारा बांगलादेश अंतरिम सरकारने रविवारी दिला.
  • बांगलादेशींना रोखण्यासाठी बांबूचे कुंपण अधिक मजबूत करण्यापासून ते रात्री जागता पहारा देण्यापर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही मीटर अंतरावरील मेघालयातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगली आहे.
     
  • रेफत अहमद बांगलादेशचे नवे सरन्यायाधीश

- बांगलादेशचे नवे सरन्यायाधीश म्हणून सय्यद रेफत अहमद यांनी रविवारी शपथ घेतली. न्यायपालिकेच्या सुधारणेच्या मागणीसाठी विरोधकांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर ओबेदुल हसन यांना सरन्यायाधीश पदावरून पायउतार व्हावे लागले होते. 
- डॉ. बिधान रंजन रॉय पोद्दार आणि सुप्रदीप चकमा यांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

Web Title: An island in Bangladesh not given, power lost Sheikh Hasina alleges US conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.