भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:08 AM2024-07-03T09:08:55+5:302024-07-03T09:09:39+5:30

ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून सतत होणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने ऋषी आपले जीवन आरामात जगत होते.

An Rishi Shah is an American businessman of Indian origin a big scam in America; 8,000 crore fraud of investors | भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक

भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक

शिकागो : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती ऋषी शाह यांना अमेरिकेतील न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपाखाली साडेसात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शाह याने गुगल आणि गोल्डमन ग्रुपसारख्या बड्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांची तब्बल ८.३५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. अमेरिकन कॉर्पोरेट इतिहासातील ही सर्वांत मोठी फसवणूक आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ३८ वर्षीय शाह याने २००६ मध्ये आउटकम हेल्थ नावाची कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी डॉक्टरांच्या कार्यालयात दूरचित्रवाणी लावायची आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी जाहिराती देत असे. या कंपनीत श्रद्धा अग्रवाल ऋषीची सह-संस्थापक होती. २०१७ मध्ये गोल्डमन, अल्फाबेट आणि इलिनॉयचे गव्हर्नर प्रित्झकर यांनी आउटकम हेल्थ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. एप्रिल २०२३ मध्ये, शाह यांना १२ हून अधिक आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले.

झपाट्याने नफा कमविला, मात्र...
कंपनीच्या आकडेवारीनुसार, त्यांनी या व्यवसायात झपाट्याने नफा कमावला. २०१० पर्यंत आउटकम हेल्थ कंपनी या क्षेत्रात मोठे नाव म्हणून उदयास येऊ लागली. सुरुवातीच्या काळात कंपनीने अनेक मोठ्या ग्राहकांकडून पैसे घेतले. यामुळे शिकागोच्या कॉर्पोरेट जगतातील मोठ्या नावांमध्ये ऋषी शाह यांचा समावेश झाला. मात्र, एकीकडे ते झपाट्याने नफा कमवत असताना, दुसरीकडे ऋषी, श्रद्धा आणि कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी यांच्या गुंतवणूकदारांची आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा कट रचत होते.

खोटे बोलून घेतले पैसे
तिघांनी मिळून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांकडून पैसे घेतले आणि टीव्हीवर जाहिरात दिली नाही. याशिवाय त्यांनी कंपनीच्या नफ्याबाबत खोटे दावेही केले. नोवो नॉर्डिस्कसारख्या बड्या अमेरिकन औषध कंपन्यांचीही शहा यांनी फसवणूक केली. ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून सतत होणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने ऋषी आपले जीवन आरामात जगत होते. तो अनेकदा परदेश दौऱ्यावर जात होता, त्याच्याकडे खासगी जेट आणि नौकाही होती. याशिवाय त्याने ८३ कोटी रुपयांचा बंगलाही खरेदी केला आहे.

Web Title: An Rishi Shah is an American businessman of Indian origin a big scam in America; 8,000 crore fraud of investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.