शेती सुरु होण्यापूर्वीही मानवाने केला होता स्वयंपाक; 14,400 वर्षांपूर्वीचा सापडला पाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 06:11 PM2018-07-19T18:11:25+5:302018-07-19T18:13:09+5:30
जॉर्डनमध्ये आता 14,400 वर्षांपूर्वीच्या पावाचे तुकडे सापडले आहेत. शेतीचा शोध किंवा शेतीची सुरुवात होण्यापूर्वी 4000 वर्षे आधी मानवाने पाव तयार केला होता असा कयास शास्त्रज्ञांनी लावला आहे.
अम्मान- मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांचे कोडे आजही पूर्ण उलगडलेले नाही. वेगवेगळ्या कालखंडात मनुष्य आपल्या सवयींमध्ये, खाण्या-पिण्यात, जगण्यात बदल करत गेला किंवा बदल होत गेले. जॉर्डनमध्ये आता 14,400 वर्षांपूर्वीच्या पावाचे तुकडे सापडले आहेत. शेतीचा शोध किंवा शेतीची सुरुवात होण्यापूर्वी 4000 वर्षे आधी मानवाने पाव तयार केला होता असा कयास शास्त्रज्ञांनी लावला आहे.
शेती करण्यापूर्वी मनुष्य केवळ अन्न, फळं, कंदमुळं गोळा करुन खायचा किंवा शिकार करुन आपलं पोट भरायचा. या काळात त्यांनी काही रानटी प्रजातीच्या धान्यांच्या बिया गोळा करुन त्याचा पाव भाजल्याची शक्यता आहे. या रानटी प्रजातींच्या बियांपासून म्हणजेच धान्यांपासून पोट भरता येऊ शकतं हे लक्षात आल्यावरच माणसानं धान्यासाठी निओलिथिक काळामध्ये शेती करायला सुरुवात केली असं मानलं जातं.
Humans made bread BEFORE they learnt how to grow wheat: 14400 year-old charred flatbread is ... - https://t.co/yHsiNRNiTe#GoogleAlerts
— おのころ金造 (@onokorokinzo) July 18, 2018
जॉर्डनच्या ईशान्येस असणाऱ्या वाळवंटातील शुबाय्का 1 या जागेवर 14,400 वर्षांपूर्वीचे अन्नाचे जळालेले नमुने सापडले आहेत. कोपनहेगन विद्यापिठात यासंदर्भात संशोधन करणाऱ्या अमाइया अरान्झ ओतेइगुई यांनी याबाबत आपलं निरीक्षण नोंदवताना सांगितले, '' शुबाय्का 1 येथे सापडलेल्या भट्टीमध्ये अन्नाचे काही जळालेले नमुने सापडले आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा शोध आहे. यामुळे 14 हजार वर्षांपूर्वीच्या खाद्याची माहिती मिळते. एकूण 24 नमुन्यांची तपासणी केली असता आपल्य़ा रानटी पूर्वजांना बार्ली, आइनकॉर्न, ओट गोळा करुन त्याचे पदार्थ करण्यासाठी पीठ करावं लागतं हे माहिती होतं. युरोप आणि तुर्कस्थानातील विविध निओलिथिक आणि रोमन स्थळांजवळ सापडलेल्या पदार्थांच्या अवशेषांशी हे नमुने मिळते-जुळते आहेत. शेतीची सुरुवात होण्यापूर्वी बराच काळ आधी पावासारखे पदार्थ तयार करण्यात मनुष्य अवगत होता हे आपल्याला माहिती आहेच.''