...आणि डेव्हिड कॅमेरुन हसले
By admin | Published: November 14, 2015 01:29 AM2015-11-14T01:29:15+5:302015-11-14T01:29:15+5:30
तीन दिवसांच्या लंडन भेटीवर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती, भारतीय समुदायासह ब्रिटिस संसदेला संबोधित केले. अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या संधीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी
लंडन : तीन दिवसांच्या लंडन भेटीवर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती, भारतीय समुदायासह ब्रिटिस संसदेला संबोधित केले. अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या संधीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी इंग्लंड आणि भारत यांच्या गेल्या अनेक शतकांच्या संबंधाचा वारंवार उल्लेख केला. पंतप्रधानांच्या भाषणला ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्यासह खासदारांनी उठून उभे राहून टाळ््यांच्या कडकडाटात दाद दिली.
ब्रिटिश संसदेच्या भाषणाच्या सुरुवातीस सर्वांना अभिवादन करुन, मला माहिती आहे, सध्या संसदेचे अधिवेशन सुरु नसल्यामुळे पंतप्रधान कॅमेरुन निर्धास्त आहेत असे म्हणताच डेव्हिड कॅमेरुन यांच्यासह सर्व खासदारांनी खळखळून हसत त्यांना दाद दिली. ‘ब्रिटिश संसदेत प्रवेश करताना मी आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी महात्मा गांधींच्या पुतळ््याला अभिवादन केले. परदेशात असताना ब्रिटिश संसदेसमोर गांधींचा पुतळा कसा?’ हा प्रश्न मला विचारला गेला आहे, त्याला मी उत्तर दिले होते, ‘गांधींजींचे महात्म्य ओळखण्याइतपत ब्रिटीश तितके हुशार आहेत आणि गांधींजींची शिकवण सर्वांना वाटण्याइतके भारतीय उदार मनाचे आहेत.’ पंतप्रधान मोदींच्या या वाक्यालाही उपस्थित सदस्यांनी जोरदार दाद दिली. भारतीय अर्थव्यवस्थेची चालू असणारी घोडदौड आणि प्रगती याबाबतही पंतप्रधान मोदी यांनी यावेळेस आपली भूमिका मांडली. भारतामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला बदलाचे वारे दिसून येतील. भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. १९ कोटी नवी बँक खाती सुरु करण्यात आली असून ७.५ टक्के वेगाने अर्थव्यवस्थेची प्रगती होत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे आमचे ध्येयवाक्य असून सर्व व्यक्तींचा प्रगतीमध्ये समावेश व्हावा आणि ते समृद्ध व्हावेत ही आमची इच्छा आहे.
भारतीय काय
आणि ब्रिटीश काय?
भारत आणि इंग्लंड यांचे संबंध इतके रुजले आहेत की काही गोष्टी भारतीय आहेत की ब्रिटीश हे ओळखणे अवघड आहे असे पंतप्रधान मोदी यावेळेस म्हणाले.
ब्रुक बाँड चहा की लॉर्ड गुलाम नन यांची करी (आमटी) अशा अनेक उदाहरणांनी आपले संबंध किती खोल रुजले आहेत ते समजते.
आम्हाला जितका इंग्लंडमधील भांगडा रॅप आवडतो तितकेच तुम्हाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्लिश कादंबऱ्या आवडतात.
संसदेमध्ये दोन्ही बाजूस म्हणजेच सत्ताधारी व विरोधकांमध्ये भारतीय वंशाचे खासदार दिसत असल्याचा उल्लेखही नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीस केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख
आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख केला. भारत आणि इंग्लंड यांच्या भागीदारीच्या हेतूबद्दल विचार करताना भारताचे महान पुत्र डॉ. आंबेडकर यांचा विचार केलाच पाहिजे. त्यांची १२५ वी जयंती आम्ही साजरी करत असून त्यांच्या लंडनमधील निवासस्थानाला आम्ही सामाजिक न्यायासाठी अर्पण करत आहोत. डॉ. आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि संसदीय लोकशाहीचे प्रणेते नव्हते, तर दुर्बळांच्या उत्थापनासाठी त्यांनी कार्य केले. सर्व मनुष्यांना सन्मान व शांततेने जगता यावे म्हणून त्यांनी न्याय, समानता व मानवता या तत्त्वांसाठी आयुष्य वेचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिटीश संसदेचे सभागृह स्वत: डेव्हिड कॅमेरुन यांनी फिरुन दाखविले व सभागृहाची रचना समजावून दिली. यावेळेस त्यांच्यासह हाऊस आॅफ कॉमन्सचे सभापती जॉन बॅर्को आणि हाऊस आॅफ लॉर्डसच्या बॅरोनेव डिसुझा उपस्थित होते.