...आणि स्मार्टफोन झाला त्याची अर्धांगिनी!
By admin | Published: July 2, 2016 04:58 PM2016-07-02T16:58:12+5:302016-07-02T16:58:12+5:30
मोबाईल फोन आणि खास करून स्मार्ट फोन हे आता केवळ संपर्काचे साधन न राहता जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचे एक अविभाज्य भाग झाले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
लास वेगास (अमेरिका): मोबाईल फोन आणि खास करून स्मार्ट फोन हे आता केवळ संपर्काचे साधन न राहता जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचे एक अविभाज्य भाग झाले आहेत. जागेपणीच्या काळात सदैव हाहात असणारे हे टिचभर यंत्र जणू मानवी शरीराचा एक नवा अवयव ठरू पाहात आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीनेस स्मार्टफोनशी चक्क लग्न करून या प्रेमाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. नव्हे स्मार्टफोनची अपरिहार्यता ओळखून त्याने त्याला‘अर्धांगिनी’चा दर्जा दिला आहे.
ज्याला ‘हटके’ म्हणावे अशा अनेक विचित्र गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या लास व्हेगास या स्वप्ननगरीत हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. अर्थात नेवादा राज्यात मनुष्य आणि निर्जिव वस्तुच्या अशा विवाहास कायदेशीर मान्यता नाही. पण हा विवाह कायद्यासाठी नव्हे तर बदलत्या जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी केला गेला, हे उघड आहे.
‘लास व्हेगास रिव्ह्यू जर्नल’ या स्थानिक वृत्तपत्राने हे वृत्त देताना लिहिले की, हा विवाह सोहळा लास व्हेगासला साजेश्या थाटात पार पडला. नवरदेव अॅरॉन चेरव्हेनाक अगदी नटून थटून आला होता, पण समोर असलेली वधू स्मार्टफोन असल्याने तिने ‘वेडिंग गाऊन’ऐवजी संरक्षक वेष्टण परिधान केले होते.
लिटल लास व्हेगास चॅपेलमध्ये ख्रिश्चन धार्मिक रुढींनुसार या विवाहात एकनिष्ठतेच्या आणाभाकाही घेतल्या गेल्या. लग्न लावणाऱ्या चर्चमधील पुरोहिताने रिवाजाप्रमाणे विचारले, ‘ अॅरॉन, तू या स्मार्टफोनचा तुझी लग्नाची पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार आहेस? तू स्मार्टफोनला प्रेमाचे, सुखासमाधानाचे आणि कधीही अंतर न देण्याचे अभिवचन द्यायला तयार आहेस?’ या सर्व प्रश्नांना अॅरॉन यानेही मनापासून ‘हो’ असे उत्तर दिले. अर्थात धर्मरिवाजानुसार असे अभिवचन पत्नीकडून घेणे शक्य नव्हते व ते घेतलेही गेले नाही. त्यामुळे या विवाहात तेवढाच उणेपणा राहून गेला.
स्मार्टफोनशी विवाह करणारा अॅरॉन कलावंत व कला दिग्दर्शक आहे. विवाहानंतर तो नववधूसह मधुचंद्रासाठी कुठे गेला हे मात्र समजू शकले नाही!
सुरुवातीस असे लग्न लावण्यासाठी चॅपेलची जागा द्यायची की नाही, याबाबत माझी द्विधा मन:स्थिती होती. पण नंतर विचार केला की, या विवाहाने समाजात वेगळा संदेश जाणार असेल तर काय हरकत आहे आणि केवळ विवाहाला परवानगीच न देता मीही त्यात मनापासून सहभागी झालो असे मायकेल केली, लास व्हेगास चॅपेलचे मालक यांनी सांगितले.