अँजेला मर्केल पुन्हा जर्मनीच्या चान्सलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:20 AM2018-03-15T04:20:44+5:302018-03-15T04:20:44+5:30
जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची बुधवारी चान्सलरपदी सलग चौथ्यांना निवड केली. त्यामुळे युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमधील तीन महिन्यांची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली.
बर्लिन : जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची बुधवारी चान्सलरपदी सलग चौथ्यांना निवड केली. त्यामुळे युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमधील तीन महिन्यांची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली.
सन २००५ पासून चान्सलर असलेल्या मर्केल निवडणुकीत एकमेव उमेदवार होत्या. ७०९ सदस्यांपैकी ३६४ जणांमी मर्केल यांच्या बाजूने तर ३१५ जणांनी विरोधात मतदान केले. स्वत: मर्केल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन, फक्त बव्हेरिया प्रांतापुरता मर्यादित असलेला ख्रिश्चन सोशल युनियन आणि डाव्या विचारसरणीचा सोशल डेमोक्रॅट््स या तीन पक्षांच्या आघाडीने मर्केल यांना पाठिंबा दिला. तरी आघाडीच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा मर्केल यांना ३३ मते कमी मिळाली. त्यामुळे आघाडी सरकार चालविण्यासाठी मर्केल यांना कसरत करावी लागणार आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणालाच बहुमत न मिळाल्याने परस्परांच्या विरोधात असलेल्या या तीन पक्षांची मोट बांधली गेली. हे करत असताना मर्केल यांना वित्त, परराष्ट्र, गृह व अर्थव्यवस्था ही महत्वाची खाती मित्रपक्षांना द्यावी लागली. (वृत्तसंस्था)