अॅंजेला मर्केल सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी, आघाडी सरकारसाठी प्रयत्न करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 01:38 PM2017-09-25T13:38:18+5:302017-09-25T13:46:35+5:30
अॅंजेला मर्केल यांनी चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवडून येण्याचा बहुमान प्ताप्त केला आहे. रिववारी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ख्रिश्चियन डेमोक्रॅटस (सीडीयू) पक्षाला 32.5 टक्के मते मिळाली आहेत.
बर्लिन, दि.25- अॅंजेला मर्केल यांनी चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवडून येण्याचा बहुमान प्ताप्त केला आहे. रिववारी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ख्रिश्चियन डेमोक्रॅटस (सीडीयू) पक्षाला 32.5 टक्के मते मिळाली आहेत. मर्केल यांच्या प्रमुख विरोधक सोशालिस्ट डेमोक्रॅटसना केवळ 20 टक्के मते मिळाली आहेत. अत्यंत कडवा उजवा पक्ष मानल्या जाणाऱ्या अल्टर्नेटिव्ह फॉर दॉइचलॅंड (एएफडी)ला अपेक्षेपेक्षा मतांची जास्त टक्केवारी मिळालेली आहे. हिटलरच्या काळानंतर प्रथमच वंशवादी आणि परदेशी लोकांना विरोध करणारा पक्ष संसदेत आला आहे.
एफडीला मते मिळाल्यामुळे जर्मनीच्या मतदारांमधील असंतोषाला वाट मिळालीच आहे त्यातून अत्यंत विखारी व प्रखर विचार असणारा एक पक्ष संसदेत येऊन पोहोचला आहे. सीरियातून येणाऱ्या आश्रितांना या पक्षाने जोरदार विरोध केला आहे. इस्लामविरोधी पक्ष म्हणूनही त्यांची ओळख आहे. जर्मनीमध्ये मिनार नसावेत अशीही मागणी त्यांनी केली होती. या पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांच्या चिंता व विचार समजून घेऊ आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे मर्केल यांनी निवडणुकीनंतर सांगितले आहे.
अॅंजेला मर्केल या नव्या आघाडी सरकारमुळे पुन्हा चॅन्सेलर होणार असल्या तरी त्यांच्या पक्षाचा जनाधार कोसळलेला दिसत असून त्यांची लोकप्रियताही घटल्याचे दिसत आहे. मर्केल यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या मार्टिन शुल्झ यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) ला 20 टक्के मते मिळतील असे ओपिनियन पोलवरुन दिसत होतेच. ओपिनियन पोलचा विचार करता गेल्या काही महिन्यांमध्ये शुल्झ मर्केल यांच्यापेक्षा फारच पिछाडीवर असल्याचे दिसून आले होते. तीन आठवड्यांपुर्वी या दोघांमध्ये टीव्हीवर दाखवण्यात आलेली एकमेव थेट चर्चा झाली, त्यामध्ये शुल्झ यांच्यापेक्षा मर्केल अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोशल डेमोक्रॅटिकला ही सर्वात कमी मते मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अॅंजेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 साली हॅम्बर्ग येथे झाला. लिपझिश विद्यापिठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या 1989 पासून राजकारणामध्ये विविध पदांवरती आहेत. गेली 12 वर्षे त्या जर्मनीच्या चॅन्सेलर असून त्यांनी स्वतःच्या विशेष वेगळ्या धोरमांमुळे युरोपात आपला स्वतःचा ठसा निर्माण केला आहे.