अँजेलिना जोलीने काढले बीजांडकोष
By admin | Published: March 25, 2015 01:38 AM2015-03-25T01:38:46+5:302015-03-25T01:38:46+5:30
अँजेलिना जोलीने कर्करोगाच्या भीतीने दोन वर्षांपूर्वी आपले दोन्ही स्तन काढून टाकले होते, तर आता तिने कर्करोगाच्याच भीतीने अंडाशय व फॅलोपीन ट्यूबही काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.
न्यूयॉर्क : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीने कर्करोगाच्या भीतीने दोन वर्षांपूर्वी आपले दोन्ही स्तन काढून टाकले होते, तर आता तिने कर्करोगाच्याच भीतीने अंडाशय व फॅलोपीन ट्यूबही काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.
मंगळवारी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लिहून ही माहिती जाहीर केली आहे. अँजेलिनाची आई, आजी व मावशी यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. हॉलीवूड सुपरस्टार अँजेलिनाच्या शरीरात ब्रका १ ( बीआरसीए१) हे जनुक आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ८७ टक्के वाढतो व अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका ५० टक्के वाढतो, असे तिने या लेखात लिहिले आहे.
अँजेलिनाच्या सीटी स्कॅनचे निकाल आले, तेव्हा अगदी प्राथमिक स्वरूपाचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. अजून त्याचे रूपांतर कर्करोगात झाले नव्हते. अंडाशय काढावा किंवा नाही, याबाबत तिच्यापुढे पर्याय होता. तिने अंडाशय काढण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईला तिच्या वयाच्या ४९ व्या वर्षी अंडाशयाचा कर्करोग झाला होता. मी आता ३९ वर्षाची आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया पूर्वकाळजी ठरू शकते. स्तनांच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या शरीरावर नंतर काही परिणाम झाले नाहीत; पण या शस्त्रक्रियेचे तसे नाही. या शस्त्रक्रियेचे मोठे परिणाम होऊ शकतात. (वृत्तसंस्था)
४अँजेलिना म्हणते, अशा परिस्थितीत लवकरात लवकर निर्णय घ्या. मी कर्करोगप्रवण आहे ही बाब बदलणार नाही. अजूनही मी स्त्री आहे, मी स्वत: व माझे कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी हे निर्णय घेत आहे. माझ्या मुलांना असे कधी म्हणावे लागणार नाही, की मॉमचा मृत्यू गर्भाशयाच्या कर्करोगामुळे झाला.
४आरोग्याबाबतची ही माहिती पतीला स्पष्ट सांगता येणे व त्यासाठी त्याचा पाठिंबा मिळणे ही माझ्या जीवनातील सर्वात सुंदर बाब आहे, असे अँजेलिनाने म्हटले आहे. आपण कशासाठी जगतो आणि आपल्याला कशामुळे फरक पडू शकतो हे मला कळले आहे. मी आता शांत आहे, असे अँजेलिना म्हणते.