सिद्धू मुसेवाला ते बाबा सिद्दिकी...पाहा गँगस्टर अनमोल बिश्नोईची क्राइम रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 07:54 PM2024-11-18T19:54:42+5:302024-11-18T19:55:21+5:30
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला सोमवारी अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे.
Anmol Bishnoi Arrested: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला सोमवारी (18 नोव्हेंबर 2024) अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आले. याच महिन्यात त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. अनमोलचे नाव अनेक हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये सामील आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूप्रकरणीही अनमोलचे नाव पुढे आले आहे. गेल्या महिन्यातच मुंबई पोलिसांना अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अनमोल कॅलिफॉर्नियात लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठवला होता.
एनआयनेही अनमोलविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून त्याचा शोध सुरू होता. एनआयएने त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या प्रत्यार्पणासाठी मकोकाच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अनमोल बिश्नोईवर अनेक गुन्हे
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अनमोल बिश्नोईचा शोध घेत होती, त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. एनआयएने 2022 मध्ये त्याच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते. तसेच, गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) विशेष न्यायालयात याचिका दाखल करत, अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
किती गुन्हे दाखल?
बाबा सिद्दिकी खून प्रकरण आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणासह अनमोल बिश्नोईविरोधात किमान 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 2022 मध्ये मूसवालाच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, 14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथे अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर झालेल्या गोळीबारातही अनमोल बिश्नोईचे नाव पुढे आले होते. या घटनेची जबाबदारी त्यानेच घेतली होती. याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांना आरोपी बनवले होते.