पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, याचिकेला 6 लाख अमेरिकन्सचा पाठिंबा
By admin | Published: October 5, 2016 10:53 AM2016-10-05T10:53:33+5:302016-10-05T12:20:31+5:30
पाकिस्तानला दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश म्हणून जाहीर करावे अशी मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेला अमेरिकेत विक्रमी प्रतिसाद मिळत आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 5 - पाकिस्तानला दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश म्हणून जाहीर करावे अशी मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेला अमेरिकेत विक्रमी प्रतिसाद मिळत आहे. फक्त एका दिवसात याचिकेवर 50 हजार लोकांनी स्वाक्ष-या केल्या असून ही आतापर्यतची सर्वात जास्त लोकप्रिय याचिका ठरत आहे. आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
सोमवारपर्यंत 6 लाख 13 हजार लोकांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र मंगळवारी तब्बल 50 हजार लोकांनी पाठिंबा दर्शवल्याने आकडा 6 लाख 65 हजारापर्यंत पोहोचला. कोणत्याही याचिकेला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद याआधी मिळालेला नाही. आतापर्यंत उच्चांक 3 लाख 50 हजार होता जो या याचिकेने पार केला आहे.
व्हाईट हाऊसने मात्र कोणतीच माहिती न देता ही ऑनलाइन याचिका बंद केली आहे. यासंबंधी व्हाईट हाऊसकडून कोणतंच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. याचिका बंद केल्यानंतर करण्यात आलेल्या स्वाक्ष-या नंतर ग्राह्य धरल्या जातील याची शक्यता आहे.
व्हाइट हाऊसकडून प्रतिसाद मिळण्यासाठी या याचिकेवर ३० दिवसांमध्ये एक लाख स्वाक्षऱ्या होणे आवश्यक होते. आणि हा निकष एका आठवडय़ाहून कमी काळातच गाठला गेला असल्यानेयाचिका बंद केली गेली असल्याचीही शक्यता आहे. 60 दिवसांमध्ये व्हाईट हाऊस याचिकेवर उत्तर देण्याची अपेक्षा आहे.
ब्रिटनमध्येही याचिका
ब्रिटीश संसदेनेही पाकिस्तानला 'दहशतवादी राष्ट्र' घोषित करण्यासाठी पाऊल टाकले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना फक्त आश्रय देत नाही तर आर्थिक मदतही पुरवतो. पाकिस्तानच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जगातील दहशतवाद संपवण्यात अडसर निर्माण होत आहे, अशा आशयाची याचिका ब्रिटनने दाखल केली आहे. या याचिकेने रविवारी किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचा मापदंड पार केल्यामुळे तिला प्रतिसाद देणे ब्रिटिश सरकारला बंधनकारक झाले आहे.