Annual Global Liveability Index : जगात राहण्यासाठी सर्वात 'नालायक' शहरांमध्ये पाकिस्तानचे कराची; ढाक्याचाही नंबर लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 09:02 AM2022-08-11T09:02:10+5:302022-08-11T09:09:59+5:30
जगातील राहण्यायोग्य शहरे युरोप आणि कॅनडामध्ये आहेत. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना जगातील राहण्यासाठी टॉप 10 ठिकाणांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 2018 आणि 2019 मध्येही व्हिएन्ना अव्वल ठरले होते.
जगात राहण्यासाठी सर्वात नालायक शहरांमध्ये पाकिस्तानच्या कराचीचा समावेश झाला आहे. इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिटने जगातील राहण्यासाठी लायक आणि नालायक अशा १०-१० शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यासाठी १७२ शहरांचा अभ्यास करण्यात आला. नालायक शहरांच्या यादीत पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीचा समावेश झाला आहे.
कराची पुन्हा एकदा जगातील टॉप 10 सर्वात वाईट ठिकाणांपैकी एक बनले आहे. कराचीला यंदा सातवे स्थान मिळाले आहे. अभ्यासामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. परकीय चलनाचा घटता साठा आणि वाढत्या महागाईमुळे पाकिस्तान आर्थिक मंदीच्या मार्गावर आहे.
UNDP च्या मते, पाकिस्तानवर 250 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर आहे आणि देशाची आर्थिक राजधानी असलेले कराची शहर देखील गंभीर अस्थिरतेच्या काळातून जात आहे. हे संकट लाखो लोकांना दारिद्र्याकडे आणि उपासमारीच्या दिशेने नेत आहे. त्याबरोबरच सामाजिक अशांतता वाढण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानमधील चलनवाढीचा दर जुलैमध्ये दुहेरी अंकात पोहोचला, ही जवळपास सहा वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे. याशिवाय, देशातील गरीब राहणीमान, चोरी, तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसाचार यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली आहे.
राहण्यायोग्य शहरे कुठे?
जगातील राहण्यायोग्य शहरे युरोप आणि कॅनडामध्ये आहेत. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना जगातील राहण्यासाठी टॉप 10 ठिकाणांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 2018 आणि 2019 मध्येही व्हिएन्ना अव्वल ठरले होते.
पहिली दहा 'नालायक' शहरे...
- तेहरान, इराण
- डौआला, कॅमेरून
- हरारे, झिम्बाब्वे
- ढाका, बांगलादेश
- पोर्ट मोरेस्बी, पीएनजी
- कराची, पाकिस्तान
- अल्जियर्स, अल्जेरिया
- त्रिपोली, लिबिया
- लागोस, नायजेरिया
- दमास्कस, सीरिया
पहिली दहा लायक शहरे...
1. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
2. कोपनहेगन, डेन्मार्क
3. झुरिच, स्वित्झर्लंड
4. कॅलगरी, कॅनडा
5. व्हँकुव्हर, कॅनडा
6. जिनिव्हा, स्वित्झर्लंड
7. फ्रँकफर्ट, जर्मनी
8. टोरोंटो, कॅनडा
9. अॅम्सटरडॅम, नेदरलँड
10. ओसाका, जपान आणि मेलबर्न, ऑस्ट्रेलिया (टाय)