इसिसकडून आणखी एक प्राचीन मंदिर उद्ध्वस्त
By admin | Published: August 31, 2015 11:15 PM2015-08-31T23:15:08+5:302015-09-01T00:24:29+5:30
मागील आठवड्यातच एक मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या इसिसने सोमवारी सिरियाच्या पाल्मिरातील आणखी एक पुरातन मंदिर स्फोटाने उडविले. हा स्फोट एवढा भयंकर होता की
बेरुत : मागील आठवड्यातच एक मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या इसिसने सोमवारी सिरियाच्या पाल्मिरातील आणखी एक पुरातन मंदिर स्फोटाने उडविले. हा स्फोट एवढा भयंकर होता की, परिसर अक्षरश: हादरून गेला.
सिरियात इसिस मंदिरांना लक्ष्य करत असून दोन हजार वर्षांपूर्वीच्या या मंदिरात स्फोट घडवून आणत हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केले. हे बेल मंदिर प्राचीन कारवा शहराचा प्रमुख हिस्सा आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या स्फोटात मंदिराचे प्रचंड नुकसान झाले आहे. विटा व स्तंभ जमीनदोस्त झाले आहेत. इसिसने मे महिन्यात पाल्मिरावर नियंत्रण मिळविल्यानंतर येथे विध्वंस सुरू केला आहे. मागील आठवड्यातच प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओत बालशमिन मंदिर उडविल्याचे दाखविण्यात आले होते.
बेलच्या या रोमन मंदिराचे नेमके किती नुकसान झाले आहे याचा सध्या अंदाजच लावला जात असून स्थानिक नागरिकांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार स्फोटाची तीव्रता पाहता मंदिराचे मोठे नुकसान झाले असून परिसरात विटा, मातीचे ढीग पडले आहेत. पर्यटकांच्या दृष्टीने हे मंदिर महत्त्वाचे मानले जाते. एका अंदाजानुसार इसिसच्या कब्जापूर्वी या मंदिरात दरवर्षी किमान दीड लाख पर्यटक भेट देत होते. (वृत्तसंस्था)