बांगलादेशात आणखी एका ब्लॉगरची हत्या
By admin | Published: May 12, 2015 11:23 PM2015-05-12T23:23:45+5:302015-05-12T23:23:45+5:30
इस्लामी कट्टरवाद्यांनी बांगलादेशात आणखी एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची त्याच्या घराजवळ मंगळवारी निर्घृण हत्या केली. मुस्लिमबहुल बांगलादेशात
ढाका : इस्लामी कट्टरवाद्यांनी बांगलादेशात आणखी एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची त्याच्या घराजवळ मंगळवारी निर्घृण हत्या केली. मुस्लिमबहुल बांगलादेशात गेल्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.
पोलिसांनी सांगितले की, अनंता बिजॉय दास आज सकाळी सिलहट शहराच्या सुबिडबाजार भागातील आपल्या घरातून कार्यालयाला जात होते. त्यावेळी चार मुखवटाधारी व्यक्तींनी घराजवळच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यातच दास यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांच्या मते, हल्लेखोरांनी अनंता दास यांच्यावर पाठीमागून वार केले. डोक्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दास यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, तो ब्लॉगवर ‘भौतिकवाद आणि तर्क’ यावरील लेखनासाठी ओळखला जात होता. त्याने अविजित रॉय यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावनाही लिहिली होती. उल्लेखनीय म्हणजे अविजित रॉय या ब्लॉगरची गेल्या फेब्रुवारीत संशयित इस्लामी कट्टरवाद्यांनी हत्या केली होती. नास्तिक ब्लॉगरची बांगलादेशातील ही पहिली हत्या होती. फेब्रुवारीत सशस्त्र हल्लेखोरांनी ४५ वर्षीय रॉय यांची निर्घृण हत्या केली होती. (वृत्तसंस्था)