दोन दिवसांत आणखी एक बोट बुडाली! 500 लोकांनी खचाखच भरलेली; 79 जणांचा मृत्यू, 104 बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 10:44 AM2023-06-15T10:44:08+5:302023-06-15T10:44:18+5:30
मच्छीमारी बोट या लोकांना घेऊन युरोपला निघाली होती. हे लोक युरोपमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते.
नायजेरियामध्ये वऱ्हाडींची बोट नदीत बुडून १०० लोकांचा मृत्यू झालेला असताना ग्रीसच्या समुद्रातून अत्यंत वाईट बातमी येत आहे. सुमारे ५०० लोकांना घेऊन युरोपला निघालेल्या बोटीला जलसमाधी मिळाली आहे. यामध्ये आतापर्यंत ७९ जणांचे मृतदेह सापडले असून अन्य बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे.
मच्छीमारी बोट या लोकांना घेऊन युरोपला निघाली होती. हे लोक युरोपमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी युनानच्या समुद्रात ही बोट बुडाली. मंगळवारी रात्रीपासून तटरक्षक दल, नौदल आणि विमाने मदत कार्य आणि सर्च ऑपरेशन राबवत आहेत. आतापर्यंत किती प्रवासी बेपत्ता आहेत हे अद्याप समोर आलेले नाही.
हे ८० ते १०० फुट लांब जहाज होते. एका बाजुला अचानक लोक गेल्याने हे जहाज कलंडले. काही वेळातच ते बुडाले. कालामाटाच्या दक्षिण बंदरावरील शहराचे उप महापौर आयोनिस ज़ाफ़िरोपोलोस यांनी या जहाजात ५०० हून अधिक लोक होते.
तटरक्षक दलाच्या आणि खासगी जहाजांनी या बोटीला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांना असे करण्यापासून या बोटीवरील लोकांनी रोखले. ते लोक सतत आम्हाला इटलीला जायचे आहे, असे सांगत होते. मध्यरात्री १.४० वाजता या बोटीचे इंजिन नादुरुस्त झाले. यानंतर १० ते १५ मिनिटांत बोट बुडाली असे तटरक्षक दलाने सांगितले.
जहाजावरील 104 जणांना वाचवण्यात यश आले आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांपैकी २५ जणांना 'हायपोथर्मिया' किंवा तापाच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.