काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:50 IST2021-08-29T18:38:08+5:302021-08-29T18:50:57+5:30
Afghanistan crisis: यापूर्वी गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 170 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय
काबुल:अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनंतर रविवारी पुन्हा एकदा मोठा बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक किलोमीटर दूरपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यापूर्वीच पुढील 24 ते 36 तासांच्या बॉम्ब स्फोटाचा अलर्ट जारी केला होता.
अफगाण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुल शहरात हा मोठा स्फोट झाला आहे. काबुल विमानतळाजवळील खाजेह बागरा या निवासी भागात एका घरावर रॉकेट डागण्यात आले आहे. ज्या घरात हे रॉकेट पडले त्या घरातील एका मुलाचा मृत्यू झालाय तर तीन जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही, पण इस्लामिक स्टेट खोरासन या संस्थेवरच या हल्ल्याचा संशय आहे.
First Footage - Kabul explosion, Khawaja Bughra, PD15 pic.twitter.com/ioG4PTI6uB
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 29, 2021
गुरुवारी 170 नागरिकांचा मृत्यू
दरम्यान, अमेरिकन दूतावासाने सलग तिसऱ्या दिवशी काबुल विमानतळावर हल्ल्याच्या धमकीचा इशारा जारी केला होता. अमेरिकेने आपल्या नागरिकांना काबुल विमानतळ आणि त्याच्या आसपासच्या भागातून त्वरित माघार घेण्यास सांगितले. अमेरिकेने गुरुवारी काबूल विमानतळावर धोक्याबाबत पहिला अलर्ट जारी केला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी दहशतवादी संघटना ISIS-Khorasan (ISIS-K) ने विमानतळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 170 लोक मारले गेले.
इस्लामिक स्टेट खोरासनने 26 ऑगस्टच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
इस्लामिक स्टेट खोरासनने 26 ऑगस्ट रोजी काबुल विमातळाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील इसिसच्या अड्ड्यांवर ड्रोन हल्ले केले होते.