शार्ली हेब्दोचं आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र; ट्विटरवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 02:12 PM2017-08-24T14:12:26+5:302017-08-24T14:15:01+5:30
फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक असलेल्या शार्ली हेब्दोने आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं आहे.
मुंबई, दि. 24- फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक असलेल्या शार्ली हेब्दोने आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं आहे. शार्ली हेब्दोच्या मुखपृष्ठावर असलेलं हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असून त्या व्यंगचित्रावर जोरदार टीका होते आहे.ट्विटरवरून नेटीझन्सने शार्ली हेब्दोच्या व्यंगचित्राला चांगलंच टार्गेट केलं आहे. अशा व्यंगचित्रांमुळे इस्लामोफोबिया म्हणजेच मुस्लिमांबाबत भीती पसरते, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. या व्यंगचित्राला इस्लामोफोबिया म्हणजेच मुस्लिमांबाबत भीती पसरवणार व्यंगचित्र असं म्हणत त्यावर टीका केली जाते आहे.
The latest Charlie Hebdo cover is worse than the worst of anti Irish racism in the UK media following Provo attacks.
— Mark Malone (@soundmigration) August 23, 2017
शार्ली हेब्दोच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर नुकत्याच स्पेनमधील बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आलं आहे. यात दोन व्यक्ती एका व्हॅनच्या धडकेमुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दाखवले असून त्यात ‘इस्लाम, शांततेचा धर्म’ असं लिहिलेलं आहे. बार्सिलोना येथे एक व्हॅन गर्दीत घुसवून 14 लोकांना मारण्यात आलं होते, तर 100 पेक्षा जास्त लोक त्या घटनेत जखमी झाले होते. शार्ली हेब्दोचे हे नवीन व्यंगचित्र संपूर्ण जगात 1.5 अब्ज अनुयायी असलेल्या धर्माला कलंकीत करत आहे, असं टीकाकारांनी म्हटलं आहे. शार्ली हेब्दोचं हे व्यंगचित्र ट्विटर तसंच इतर सोशल मीडिया संकेतस्थळांवर ट्रेंडिंग टॉपिक बनलं आहे. त्यानंतर सोशलिस्ट संसद सदस्य आणि माजी मंत्री स्टीफेनी ल फॉल यांनी त्यांचं ‘अत्यंत धोकादायक’ या शब्दांत वर्णन केलं.
On l'attendait, la voici: une autre petite couv de Charlie Hebdo pour inciter a la haine anti-musulman.ne.s... #Nauseepic.twitter.com/5havDBbam3
— Philippe Marlière (@PhMarliere) August 22, 2017
पण एक्सपर्ट व धोरणकर्ते हे शांतताप्रिय आणि कायदा पाळणाऱ्या मुस्लिमांना ध्यानात घेऊन कठीण प्रश्न टाळत आहेत, असं शार्ली हेब्दोचे संपादक लॉरेंट यांनी संपादकीयमध्ये म्हंटलं आहे. प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र छापल्यामुळे शार्ली हेब्दोवर जानेवारी 2015 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता.
बार्सिलोनामध्ये नेमकं काय घडलं?
स्पेनमधील बार्सिलोना शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी लास रॅमब्लास या गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वाहनानं अनेकांना चिरडल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100हून अधिक लोक जखमी आहेत. वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे. स्पेनमध्ये दुसरा होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला.