खोकल्याचे आणखी एक औषध विषारी; देशातील या सिरपचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 09:27 IST2023-04-27T08:50:50+5:302023-04-27T09:27:10+5:30
भारताच्या आणखी एका सिरपने वाद

खोकल्याचे आणखी एक औषध विषारी; देशातील या सिरपचा वाद
जिनिव्हा : भारतात उत्पादित झालेल्या आणखी एका खोकल्याच्या दूषित सिरपबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. ग्वायफेनेसिन सिरप असे त्या औषधाचे नाव असून, ते पंजाबमधील क्यूपी फार्माकेम लिमिटेड या कंपनीने तयार केले आहे. त्याची विक्री हरयाणातील ट्रिलियन फार्मामार्फत करण्यात येते. मार्शल बेटे व मायक्रोनेशिया येथे हे सिरप वितरीत केल्याचे आढळून आले.
ग्वायफेनेसिन सिरप घेतल्याने मार्शल बेटे किंवा मायक्रोनेशिया येथील मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला, याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही माहिती दिलेली नाही. या सिरपमध्ये डायथिलीन ग्यालकोल व इथिलिन ग्लायकोचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विषासारखा विपरीत परिणाम होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील थेरप्युटिक गुड्स ॲडमिनिस्ट्रेशन या यंत्रणेने केलेल्या चाचणीत ग्वायफेनेसिन सिरप दूषित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
गेल्या वर्षी ३०० मृत्यू
n गेल्या वर्षी भारत व इंडोनेशियाने बनविलेल्या दूषित सिरपबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरीचा इशारा दिला होता.
n गांबिया, इंडोनेशिया, उझबेकिस्तान या देशांत दूषित सिरप घेतल्याने किडनी विकार जडून ३०० मुले मरण पावली होती. त्यातील बहुतांश मुले ५ वर्षे वयाखालील होती.
n क्यूपी फार्माकेम तसेच
ट्रिलियम फार्मा या कंपन्यांनी ग्वायफेनेसिन सिरपच्या गुणवत्तेबाबत आम्हाला हमी दिलेली नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
कंपनी म्हणते... : क्यूपी फार्माकेमचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाठक म्हणाले की, निर्यात केलेल्या ग्वायफेनेसिन सिरपच्या नमुन्याची पुन्हा चाचणी केली. ग्वायफेनेसिन सिरपच्या १८ हजार बाटल्या कंबोडियाला निर्यात करण्याची आम्हाला परवानगी मिळाली होती. मात्र, या सिरपचा साठा मार्शल बेट येथे कसा पोहोचला, याची कल्पना नाही.