कॅनडात आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्यावर हल्ला; निज्जरच्या मित्राच्या घरात रात्रभर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:46 PM2024-02-02T15:46:57+5:302024-02-02T15:47:31+5:30
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यावरून कॅनडाच्या अध्यक्षांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता.
खलिस्तानी दहशतवाद्यांचा गड बनलेल्या कॅनडामध्ये या समर्थकांवर हल्ले सुरुच आहेत. कितीही भारतावर कॅनडाने आगपाखड केली तरी या दहशतवाद्यांना आसरा देण्याचे कॅनडाचे प्रयत्न काही लपलेले नाहीत. निज्जरच्या हत्येनंतर त्याच्या मित्राच्या घरावर हल्ला झाला आहे. दक्षिण प्रांतातील एका घरात रात्रभर गोळीबार सुरु होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यावरून कॅनडाच्या अध्यक्षांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारतानेही हे प्रकरण गंभीरतेने घेत कॅनडाला जशासतसे उत्तर दिले होते. आता ज्या खलिस्तानी समर्थकावर हल्ला झालाय तो याच निज्जरचा मित्र आहे.
ब्रिटिश कोलंबिया गुरुद्वारा परिषदेच्या प्रवक्त्याने सांगितले की, सिमरनजीत सिंग असे या समर्थकाचे नाव आहे. तो निज्जरचा मित्र होता. पोलीस या गोळीबाराची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी सिमरनजीतचे शेजारी आणि साक्षीदारांशी चर्चा केली आहे. सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जात आहे. या गोळीबारात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाहीय. हल्लेखोरांनी एका कारवर जोरदार गोळीबार केला आहे. तसेच घरातही गोळ्या लागल्याचे दिसत आहे. निज्जरशी संबंध असल्यामुळे त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप गुरुद्वाराच्या परिषदेने केला आहे.