मोनालिसाच्या पेंटिंगमागे आणखी एक चित्र
By admin | Published: December 8, 2015 11:26 PM2015-12-08T23:26:20+5:302015-12-08T23:26:20+5:30
जगभरातील चित्रकारांना भुरळ घालणाऱ्या आणि एक गूढ बनून राहिलेल्या मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा करण्यात आला आहे.
पॅरिस : जगभरातील चित्रकारांना भुरळ घालणाऱ्या आणि एक गूढ बनून राहिलेल्या मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा करण्यात आला आहे. या चित्राच्या मागे अन्य एक चित्र असल्याचे फ्रान्सचे वैज्ञानिक पास्कल कोटे यांचे म्हणणे आहे. दहा वर्षांच्या संशोधनातून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
संशोधक पास्कल यांनी रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा अभ्यास केला आहे. लियोनार्डो दा विंसीचे हे चित्र अनेक शतकांनंतरही एक उत्सुकता बनून राहिलेले आहे. मोनालिसाच्या या चित्रामध्ये हास्याचे भाव नाहीत अथवा नजरही थेट समोर पाहणारी नाही, असे पास्कल यांचे म्हणणे आहे. या चित्राचा ७८२ अब्ज डॉलरचा विमा आहे. दरम्यान, पास्कल यांचा हा दावा मोनालिसाचे छायाचित्र असणाऱ्या लुवरे संग्रहालयाने फेटाळला आहे. संग्रहालयाने त्यांना फक्त संशोधनासाठी सहकार्य केले आहे. त्यातील निष्कर्षाशी संग्रहालय सहमत नाही. पास्कल यांनी अभ्यासासाठी लेयर अॅम्पलिफिकेशन मेथड वापरली आहे. एखाद्या पेंटिंगमध्ये रंगांच्या थराच्या आत नेमके काय आहे? याचा अभ्यास करता येऊ शकतो. अगदी कांद्यावरील आवरणे जशी काढली जातात तशीच पेंटिंगची आतील आवरणे आपण पाहू शकतो, असा दावा पास्कल यांनी केला आहे. त्यामुळे या चित्राबाबत आतापर्यंत जे काल्पनिक दावे केले जात होते ते आपोआपच पुसले जातील, असेही त्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
जगातील सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक असणारे आणि सर्वाधिक चर्चेतील हे लियोनार्डो दा विंसी यांचे चित्र १५०३ ते १५०६ च्या काळातील आहे. मोनालिसाचे हास्य रहस्यमय असून यापूर्वीही अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत. फ्रान्सच्या लुवरे संग्रहालयात सध्या हे चित्र आहे.
संशोधक पास्कल यांच्या दाव्यानुसार या चित्रात रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजी (प्रतिबिंबित करणारा प्रकाश) वापरण्यात आली आहे. एका पेंटिंगवर दुसरे पेंटिंग असल्याने यातील हास्य रहस्यमय वाटते.