चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल, नासाचे आर्टेमिस झेपावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:48 AM2022-11-17T07:48:48+5:302022-11-17T07:49:30+5:30
NASA : सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस-१' मोहिमेअंतर्गत ओरायन यान बुधवारी पहाटे अखेर अवकाशात झेपावले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील हे पहिले रॉकेट प्रक्षेपण आहे.
केप केनाव्हेरल : सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस-१' मोहिमेअंतर्गत ओरायन यान बुधवारी पहाटे अखेर अवकाशात झेपावले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील हे पहिले रॉकेट प्रक्षेपण आहे. याअंतर्गत नासाच्या रॉकेटने ओरायन यान अवकाशात प्रक्षेपित केले. याद्वारे अमेरिका ५० वर्षांपूर्वीच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. हे प्रक्षेपण म्हणजे नासाच्या आर्टेमिस चांद्रमोहिमेची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
तीन आठवड्यांचे उड्डाण यशस्वी झाले तर हे रॉकेट चालक पथकाच्या एका रिकाम्या कुपीला चंद्राच्या चोहोबाजूंनी विस्तीर्ण कक्षेत नेईल व ती कुपी डिसेंबरमध्ये पृथ्वीवर परत येईल. अनेक वर्षांचा उशीर व अनेक अब्जावधींच्या खर्चानंतर अंतराळ प्रक्षेपण प्रणाली रॉकेटने केनेडी स्पेस सेंटरवरून अखेर उड्डाण केले.
- ओरियान पृथ्वीपासून ३,७०,००० किलोमीटर अंतरावरील चंद्रावर सोमवारपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
ओरियान
- कुपी अंतराळ वीरांना केवळ चंद्राच्या कक्षेपर्यंत घेऊन जाईल.
- $४.१ अब्ज खर्चाचे चाचणी उड्डाण २५ दिवसांपर्यंत चालू शकते.
काय आहेत नासाच्या पुढील योजना?
२०२४ पर्यंत पुढील उड्डाणात चंद्राच्या जवळ चार अंतराळवीरांना पाठविण्याचे लक्ष्य आहे.
२०२५ मध्ये मानवाला तेथे उतरविणार. चंद्रावर एक बेस तयार करणार.
२०३० तसेच २०४० च्या दशकाच्या अखेरीस मंगळावर अंतराळवीर पाठविणार.