सूर्यमालेबाहेर सापडला आणखी एक पाणीदार ग्रह; २३ तासांचे एक वर्ष, तापमान २,७०० अंश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:11 AM2023-06-05T08:11:28+5:302023-06-05T08:12:10+5:30
नासाने सूर्यमालेबाहेरील ग्रहावर पाण्याचा शोध घेतला आहे.
वॉशिंग्टन: नासाने सूर्यमालेबाहेरील ग्रहावर पाण्याचा शोध घेतला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ४०० प्रकाशवर्षे दूर असून, त्याचा शोध २००९मध्ये लागला होता. या ग्रहाच्या वातावरणात वाफ व वायू आढळले आहेत.
डब्ल्यूएएसपी-१८बी असे ग्रहाचे नाव असून, हबल, टीईएसएस व स्पिट्जर टेलिस्कोपद्वारे हा ग्रह सर्वप्रथम पाहण्यात आला होता. आता जेम्ब वेब टेलिस्कोपने पाण्याचा वेध घेतला आहे. हा ग्रह गुरूच्या तुलनेत १० पट मोठा आहे. तेथे २३ तासांचे एक वर्ष आहे. तेथील तापमान तब्बल २,७०० अंश सेल्सिअस नोंदण्यात आले आहे. याचमुळे पाण्याची वाफ झाली व वातावरणात पसरली असावी, असे शास्त्रज्ञांना वाटते. (वृत्तसंस्था)
अन्य एका ग्रहावर आढळला होता कार्बन डायऑक्साइड
२०२२मध्ये सौरमंडलाच्या बाहेर डब्ल्यूएएसपी-३९वर कार्बन डायऑक्साइडचा शोध लागला होता. हा ग्रह पृथ्वीपासून ७०० प्रकाशवर्षे दूर आहे. वायूमुळे हा ग्रह गुरूच्या तुलनेत ३० टक्के मोठा दिसतो. वास्तविक पाहता, याचे वजन गुरूच्या वजनापेक्षा एक चतुर्थांश आहे. मात्र, याचा व्यास गुरूपेक्षा १.३ पट मोठा आहे. या ग्रहावरील तापमान ९०० अंश होते.