धार्मिक द्वेषाला उत्तर आता धार्मिक एकजुटीतून
By admin | Published: December 15, 2015 03:19 AM2015-12-15T03:19:16+5:302015-12-15T03:19:16+5:30
अमेरिकेमध्ये इस्लामचा द्वेष करण्याचे प्रकार वाढत असताना त्याचा फटका शीख समाजालाही बसत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी शीख आणि मुस्लिम एकत्र आले आहेत.
शिकागो : अमेरिकेमध्ये इस्लामचा द्वेष करण्याचे प्रकार वाढत असताना त्याचा फटका शीख समाजालाही बसत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी शीख आणि मुस्लिम एकत्र आले आहेत.
जे लोक मुस्लिमांचा द्वेष करतात त्यांना मुस्लिम आणि शीख धर्मांतील फरक समजत नाही किंवा त्यांना समजून घ्यायचा नाही. या दोन्ही धर्मांच्या लोकांना शांततेने जगण्याचा हक्क आहे, असे परदीप कालेका यांनी सांगितले. कालेका हे मिलवावुकीचे माजी पोलीस अधिकारी आहेत. अमेरिकेत ९/११ चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अनेक दिवस त्यांना आपल्या वडिलांच्या घरी राहावे लागले होते. मुस्लिम समजून माझ्यासह माझ्या कुटुंबावर हल्ला होईल अशी भीती त्यांना त्यावेळी वाटायची. सॅन फ्रान्सिस्को आणि पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर कालेका यांनी पूर्णपणे वेगळीच भूमिका घेतली आहे. दोन्ही धर्मांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी शैक्षणिक सत्र व फेऱ्या काढण्याचे ठरविले आहे.
कालेका म्हणाले की मुस्लिम, ख्रिश्चन्स,ज्यू व इतर धर्माचे लोक शिखांना भेटले व त्या सगळ्यांनी चिथावणी देणाऱ्या भाषणांना व मजकुराला तोंड द्यायची तयारी केली आहे. गेल्या आठवड्यात मी मुस्लिम महिलांच्या संघटनांनाही भेटलो. (वृत्तसंस्था)
अमेरिका : मशिदीच्या भिंती केल्या विद्रूप
लॉस एंजलिस : कॅलिफोर्नियामध्ये काही समाजकंटकांनी दोन मशिदींच्या भिंतींना रंगाने विद्रूप केले. सीबीएस न्यूजने हॉथोर्न पोलीस विभागाचे प्रवक्ते ख्रिस्तोफर पोर्ट यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, नमाज पढण्यासाठी लोक रविवारी सकाळी हॉथोर्नच्या इस्लामिक सेंटरवर आले, त्यावेळी त्यांना भिंतीवर ‘जिझसमुळेच उद्धार होईल’ असा मजकूर दिसला. स्प्रेचा वापर यासाठी करण्यात आला होता.
शिखांना स्टेडियमवर प्रवेश नाकारण्याचा प्रकार
सॅन फ्रान्सिस्को : कॅलिफोर्नियातील सॅन दियागो शहरात फुटबॉलचा सामना सुरू असताना शिखांच्या गटाला तेथील सुरक्षारक्षकांनी त्रास देऊन पगडी असल्यामुळे त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नाही.
वेबसाईट ‘टेन न्यूज’ ने दिलेल्या वृत्तानुसार वरिंदर मालही आणि त्यांचे मित्र गेल्या सहा डिसेंबर रोजी ब्रोंकोर्स-चार्जर्स यांच्यातील सामना बघायला गेले होते. तेथे गेल्यावर त्यांना तुम्ही पगडी काढली तरच स्टेडियममध्ये जाता येईल, असे सांगण्यात आले. वाद-विवादानंतर शेवटी या सगळ्यांना पगडीसह आत जाऊ देण्यात आले. मालही यांचा दावा असा आहे की, एका सुरक्षा निरीक्षकाने त्यांना पुन्हा यायचे असल्यास पगडी घालून यायचे नाही, असे बजावले. मालही म्हणाले की, हे वाईट आहे. मी अमेरिकन असून माझ्यासाठी ही बाब लाजिरवाणी आहे.
‘मी त्यांना क्षमा करीन’
एनसीएएचे माजी बास्केटबॉल खेळाडू दर्श सिंग यांना तर आयुष्यभर अपमानच ऐकावा लागला आहे. नुकतेच ते फिनिक्समध्ये रस्ता ओलांडत असताना कोणी तरी त्यांच्याकडे बघून ‘ओसामा’ असे म्हणाले होते. बरेच लोक एकतर भीतीतून किंवा अज्ञानातून असे वागतात. हे कोणी सुरू केले हे मला माहिती नाही परंतु ज्या कोणी ते केले असेल त्यांना मी क्षमा करीन, असे दर्श सिंग म्हणाले.
शीख जवानाला दाढी ठेवण्याची परवानगी
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या लष्करातील शीख जवानाला दाढी वाढविण्याची व पगडी घालण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकन लष्कराकडून अशी परवानगी मिळणे खूपच दुर्मिळ आहे.
कॅप्टन समिरतपाल सिंग लष्करात दाखल झाले. त्यावेळी त्यांना त्यांचे केस कापावे लागले होते. नियमांप्रमाणे अमेरिकेचे लष्कर जवानांना लांब केस वाढवायची परवानगी देत नाही. गेल्या आठवड्यात त्यांना ही मुभा मिळाली.