Turkiye Earthquake: भयावह! तुर्कीत विमानतळाचे झाले दोन भाग; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 09:07 AM2023-02-07T09:07:12+5:302023-02-07T09:08:37+5:30
Turkiye Earthquake Updates: तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे.
तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. तुर्की, सीरियात ४० हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त ७.८ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर आतापर्यंत ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
तुर्कस्तानच्या हाताय विमानतळाची एकमेव धावपट्टीही कोसळली असून ती पूर्णपणे निरुपयोगी झाली आहे. संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या धावपट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये डांबरी रस्त्याचे दोन भाग झाल्याचे दिसून येत आहे. विमानतळावरील भूकंपामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
WATCH: The only runway at Hatay Airport in southern Turkey tore open during the earthquake pic.twitter.com/TTykRNBYUQ
— BNO News Live (@BNODesk) February 6, 2023
भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. येथील अनेक भागांत ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याचे लोकांनी सांगितले. तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, देशातील १० शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. २०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
भूकंपामागील कारण -
पृथ्वीच्या भूगर्भात मोठ-मोठ्या आकाराच्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. त्याखाली लाव्हारस आहे. त्यावर या प्लेट्स तरंगत असतात. त्यांची ज्यावेळी एकमेकांशी टक्कर होते, त्यावेळी खूप दबावामुळे या प्लेट्सचे तुकडे होऊ लागतात. त्यामुळे भूगर्भातील ऊर्जा तिथून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागते. त्यातून होणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे भूकंप येतो. तुर्कस्थानचा बहुतांश भाग हा एनाटोलियन टॅक्टोनिक प्लेटच्या क्षेत्रात आहे. ही प्लेट युरोशियन, आफ्रिकन, अरेबियन या तीन प्लेटच्या मधोमध आहे. आफ्रिकन, अरेबियन प्लेट आपल्या जागेवरून हलली की तुर्कस्थानचा भाग असलेल्या प्लेटवर सारा दबाव येऊन त्या देशामध्ये भूकंप येतो.
भविष्यवाणी खरी ठरली -
सोमवारी पहाटे दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये ७.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हजारो लोकांचा बळी गेला, पण सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (एसएसजीईओएस) संस्थेमध्ये काम करणाऱ्या फ्रँक हूगरबीट्स या संशोधकाने या दुर्घटनेचा इशारा तीन दिवस आधीच वर्तवला होता. ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३३ वाजता त्यांनी “लवकरच किंवा नंतर, दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनच्या प्रदेशात ७.५ तीव्रतेचा भूकंप होईल” असे ट्वीट केले होते. त्यांनी भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता. तीन दिवसांनंतर त्यांचा इशारा खरा ठरला आणि ट्वीट प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.