मांजरीवर संसर्गाविरोधाचे औषध कोरोनावर उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 02:50 AM2020-06-13T02:50:45+5:302020-06-13T02:51:01+5:30
संशोधनातील माहिती : मनुष्यावर चाचणी करण्याची मागितली परवानगी
वॉशिंग्टन : जगभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४ लाखांहून अधिक आहे. अमेरिकेला याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे. यावर औषध शोधण्यासाठी जगभरातील संशोधत प्रयत्न करीत आहेत. अशातच एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मांजरीमधील संसर्गजन्य आजारांवर वापरले जाणारे एक औषध माणसांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
जीसी-३७६ असे या औषधाचे नाव आहे. हे कोरोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत दिसून आले आहे. हे औषध तयार करणाऱ्या अमेरिकेतील अॅनिव्हाइव्ह लाइफ सायन्सेस या कंपनीने तेथील अन्न आणि औषध प्रशासनाकडे याची मनुष्यावर चाचणी करण्याची परवानगी मागितली आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे झांग शुआंग यांनी सांगितले की, संगणकीय मॉडेल आणि प्रयोगशाळेत केलेल्या परीक्षणाच्या आधारे जीसी-३७६ या औषधांचा परिणाम चांगला झाल्याचे आढळले. हे औषध सुरक्षित आहे. कोरोनाचा संसर्ग ज्यामुळे होतो त्या एन्झाइमला हे औषध बांधून ठेवते. हे एन्झाइम पेशीतील प्रोटिनला तोडण्याचे काम करते. यातून तयार झालेल्या अमिनो अॅसिडचा वापर कोरोना विषाणू त्याच्या वाढीसाठी करीत असतो. हे औषध कोरोना विषाणूने बाधित पेशीपर्यंत सहजपणे पोहचू शकते. मात्र कोरोनाबाधित व्यक्तीवर हे कधी वापरले
जाणार याबाबत माहिती मिळू शकली नाही. (वृत्तसंस्था)