अन्वर उल हक पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान; शाहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 07:34 PM2023-08-12T19:34:37+5:302023-08-12T19:35:08+5:30
अन्वर उल हक काकर यांची गणना देशातील प्रसिद्ध विचारवंतांमध्ये केली जाते.
पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय गदारोळात अन्वर उल हक काकर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. शाहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी अन्वर-उल-हक काकर यांच्या नावावर सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. अनवर-उल-हक काकर शनिवारीच शपथ घेऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे.
बलुचिस्तानचे खासदार अन्वर उल हक काकर यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे, असेही पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अन्वर उल हक काकर हे बलुचिस्तानचे खासदार आहेत. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 ऑगस्ट रोजी संसद विसर्जित झाल्यामुळे शाहबाज शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात आला. पाकिस्तानी घटनेनुसार, सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान काळजीवाहू पंतप्रधान निवडण्याची अंतिम तारीख शनिवारीच होती. त्यामुळे शाहबाज शरीफ यांनी आपले विश्वासू अनवर उल हक काकर यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केल्याचे सांगण्यात येते.
अलीकडेच पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून लवकरात लवकर नवीन काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त करण्याची विनंती केली होती. शाहबाज शरीफ यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रपती अल्वी यांनी लिहिले की, पाकिस्तानच्या घटनेच्या कलम 224 मध्ये पंतप्रधान आणि बाहेर जाणार्या नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते 12 ऑगस्टपूर्वी काळजीवाहू पंतप्रधान नियुक्तीसाठी प्रस्ताव देऊ शकतात. राष्ट्रपतींच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शाहबाज शरीफ यांनी नाराजी दर्शवली होती आणि पत्रामुळे आपण निराश झाल्याचे सांगितले.
अन्वर उल हक काकर यांचा राजकीय प्रवास
पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, अन्वर उल हक काकर 2018 मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते आणि ते खूप सक्रिय राजकारणी आहेत. वरिष्ठ सभागृहात निवडून येण्यापूर्वी त्यांनी प्रांतीय सरकारचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. तसेच, अन्वर उल हक काकर यांची गणना देशातील प्रसिद्ध विचारवंतांमध्ये केली जाते. ते बलुचांच्या पश्तूनांशी संबंधित काकर जमातीचे आहेत. त्यामुळे ते पश्तून आणि बलूच या दोघांचे प्रतिनिधित्व करतात. दरम्यान, अन्वर उल हक काकर यांचे पीएमएल-एन आणि पीपीपीसह मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांशीही चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. तसेच, त्यांनी बलुचिस्तान विद्यापीठातून शिक्षण घेतले असून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.