ड्रॅगनला आणखी एक दणका! बलाढ्य कंपनी चीन सोडणार; भारतात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:06 PM2020-07-17T21:06:35+5:302020-07-17T21:07:11+5:30
चीनला आणखी एक धक्का बसणार; मोठी कंपनी लवकरच भारतात येणार
नवी दिल्ली: कोरोना संकट काळात चीनला आणखी धक्का बसणार आहे. अॅपलची अॅसेब्लिंग पार्टनर पेगाट्रॉन भारतात पहिला कारखाना सुरू करणार आहे. पेगाट्रॉन जगातील सर्वात मोठी मोबाईल कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. जूनमध्ये मोदी सरकारनं जगातील मोठ्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ६.६ अब्ज डॉलरची योजना आखली. या योजनेत आर्थिक सवलतींचा समावेश आहे.
ब्लूगबर्मनं दिलेल्या वृत्तानुसार, पेगाट्रॉन आता भारतात कारखाना सुरू करणार आहे. पेगाट्रॉनचा समावेश लवकरच तैवानच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅसेब्लिंग ग्रुप फॉक्सवॉन आणि विस्ट्रॉनसोबत होणार आहे. या कंपन्या आधीपासूनच दक्षिण भारतात आयफोन तयार करतात. चीनमध्ये पेगाट्रॉनचे अनेक कारखाने असून आयफोन अॅसेब्लिंगमध्ये कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो. कंपनीचा निम्म्याहून अधिक व्यवसाय आयफोनवर अवलंबून आहे. पेगाट्रॉन दक्षिण भारतात कारखाना सुरू करणार आहे.
फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉनला भारतात विस्तार करायचा आहे. त्याचाच भाग म्हणून पेगाट्रॉन भारतात येणार आहे. पेगाट्रॉन बजेट आयफोनची निर्मिती करेल. अॅपलकडून चीनमधील कारखाना भारतात हलवण्याचा विचार सुरू आहे. कोरोनामुळे चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झालं आहे. त्याचा फटका अॅपलला बसू शकतो. त्यामुळे चीनबाहेर पडण्याचा विचार अॅपलकडून अतिशय गांभीर्यानं सुरू आहे.