आॅनलाइन विक्री होणारी अॅपलची उत्पादने बनावट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 01:57 AM2016-10-22T01:57:50+5:302016-10-22T01:57:50+5:30
अॅमेझॉनवरून अॅपलची उत्पादने खरेदी करणाऱ्यांना दक्षतेचा इशारा. अॅमेझॉन, ग्रुपॉन यांसारख्या आॅनलाइन विक्री करणाऱ्या साइट्सवर विकले जाणारे अॅपलचे ९० टक्के चार्जर
सॅन फ्रॅन्सिस्को : अॅमेझॉनवरून अॅपलची उत्पादने खरेदी करणाऱ्यांना दक्षतेचा इशारा. अॅमेझॉन, ग्रुपॉन यांसारख्या आॅनलाइन विक्री करणाऱ्या साइट्सवर विकले जाणारे अॅपलचे ९० टक्के चार्जर, यूएसबी केबल, यूएसबी पॉवर अॅडॉप्टर ही उत्पादने बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अॅपलच्या नावे बनावट उत्पादनांची आॅनलाइन विक्री करणाऱ्या मोबाइल स्टार एलएलसीविरुद्ध अॅपलने न्यायालयात खटलाही दाखल केला आहे.
अॅपलने कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी या कंपनीविरुद्ध दीड लाख आणि ट्रेडमार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी दोन दशलक्ष डॉलरचा दावा दाखल केला आहे. तसेच अॅपलच्या नावे खपवली जाणारी बनावट उत्पादने ही ज्वलनशील
असून, त्यामुळे ग्राहकांसाठी ती धोकादायक असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
आयफोन तयार करणाऱ्या अॅपलची अॅमेझॉनवर विकली जाणारी दहापैकी नऊ उत्पादने ही बनावट असतात, असे अॅपलने ट्रेडमार्क उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले. (वृत्तसंस्था)
कंपन्यांचे काय दावे?
अॅपलने अॅमेझॉनवरून पॉवर प्रोडक्ट खरेदी केले होते. पडताळणी केली असता हे प्रोडक्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर अॅपलने याबाबतची माहिती अँमेझॉनला दिली. खरेदी करण्यात आलेले हे बनावट पॉवर प्रोडक्ट मोबाइल स्टार कंपनीने तयार केले होते, असा दावा या खटल्यात अॅपलकडून करण्यात आला आहे.
मात्र अॅमेझॉनने आम्ही बनावट उत्पादनांना थारा देत नाही. उत्पादनांचा खरेपणा काटेकोरपणे तपासूनच ती विक्रीसाठी ठेवली जातात असा दावा केला आहे.