अॅपलच्या संस्थापकाचे स्मारक उद्ध्वस्त
By admin | Published: November 5, 2014 01:50 AM2014-11-05T01:50:19+5:302014-11-05T01:50:19+5:30
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात उभारलेले स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले आहे
मॉस्को : जगप्रसिद्ध अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात उभारलेले स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले आहे. जॉब्ज यांचे वारसदार व कंपनीचे सध्याचे मुख्य अधिकारी टीम कुक यांनी ते गे अथवा समलिंगी असल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर हा उत्पात घडविण्यात आला आहे.
आयफोनच्या स्वरूपातील ६ फूट उंचीचे स्टीव्ह जॉब्ज यांचे स्मारक जानेवारी २०१३ मध्ये रशियातील झेफ्स कंपनी समूहातर्फे उभारण्यात आले होते. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी गेल्या गुरुवारी समलिंगी असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर रशियातील नियमानुसार हे स्मारक उद्ध्वस्त करावे लागले, असे झेफ्सने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रशियात समलिंगी संबंधांना बंदी आहे. शिवाय हे स्मारक तरुण विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात होते. त्यामुळे शुक्रवारी ते उद्ध्वस्त करण्यात आले. रशियातील पारंपरिक मूल्यांचा आदर ठेवण्यासाठी अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी गतवर्षी अल्पवयीन मुलात समलिंगी विचार प्रसारित करण्यास बंदी घातली होती. हा कायदा लहान मुलांना या विचारापासून संरक्षण देण्यासाठी असून, रशियात समलिंगी लोकांबाबत कोणताही भेदाभेद केला जात नाही, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले होते; पण तरीही या कायद्यानंतर आपल्या समस्या वाढल्या, असे समलिंगी गटांचे म्हणणे आहे. झेप्स किंवा पश्चिम युरोपियन आर्थिक कंपन्यांकडून रशियात विविध क्षेत्रांतील उद्योग चालवले जातात, त्यात रियल इस्टेट, बांधकाम, जाहिरात व अर्थपुरवठा या उद्योगांचा समावेश आहे.
नागरी अधिकार अधिक बळकट व्हावेत यासाठी आपण समलिंनी असल्याची कबुली देत आहोत, असे टीम कुक यांनी म्हटले होते; पण अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज हे समलिंगी नव्हते. (वृत्तसंस्था)