डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी फेटाळला, अस्थिरता निर्माण होण्याची व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 08:33 IST2025-02-02T08:32:41+5:302025-02-02T08:33:28+5:30
इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीगच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कैरो येथील झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी फेटाळला, अस्थिरता निर्माण होण्याची व्यक्त केली भीती
कैरो : इस्रायल-हमासमधील संघर्षामुळे विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना इजिप्त व जॉर्डन देशात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब राष्ट्रांसमोर ठेवला होता. मात्र, अरब राष्ट्रांनी शनिवारी एकमताने हा प्रस्ताव फेटाळून लावत पॅलेस्टिनी नागरिकांच्या स्थलांतराला विरोध केला.
इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीगच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कैरो येथील झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.
गाझा व वेस्ट बँक क्षेत्रातील पॅलेस्टिनी नागरिकांना बाहेर काढण्यासंदर्भातील कुठलीही योजना आम्हाला मान्य नसल्याचे एक संयुक्त निवेदनाद्वारे अरब राष्ट्रांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या कुठल्याही योजनेमुळे प्रदेशाच्या स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
पॅलेस्टिनी नागरिकांचे स्थलांतर कधीही सहन करणार नाही किंवा त्याला परवानगी दिली जाणार नसल्याचे गत महिन्यात इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसा यांनी स्पष्ट केले होते.