प्रजननक्षम जनुकांमुळे आयुष्य होतेय कमी ? संशोधकांचा दावा; उत्परिवर्तन अनेक पिढ्यांनंतर बनेल ओझे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:34 AM2023-12-13T10:34:34+5:302023-12-13T10:35:01+5:30

प्रजनन क्षमता वाढवणारे जनुक मानवी आयुष्य कमी करू शकतात, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

Are Fertility Genes Shortening Life? Researchers claim; Mutation becomes a burden after many generations | प्रजननक्षम जनुकांमुळे आयुष्य होतेय कमी ? संशोधकांचा दावा; उत्परिवर्तन अनेक पिढ्यांनंतर बनेल ओझे

प्रजननक्षम जनुकांमुळे आयुष्य होतेय कमी ? संशोधकांचा दावा; उत्परिवर्तन अनेक पिढ्यांनंतर बनेल ओझे

न्यूयॉर्क : प्रजनन क्षमता वाढवणारे जनुक मानवी आयुष्य कमी करू शकतात, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. जीन्स हा वारशाचा मूलभूत घटक आहे. हे संशोधन जर्नल सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे.

मानवी डीएनए डेटाच्या अभ्यासावर आधारित संशोधनात संशोधकांना आढळून आले की, असे शेकडो उत्परिवर्तन (जीन्स) आहेत, ज्यामुळे तरुणांची प्रजनन क्षमता लक्षणीयरीत्या वाढू शकते, परंतु नंतर शारीरिक नुकसानदेखील वाढू शकते.

अवयवांच्या वृद्धत्वाचा धोका?

दुसऱ्या एका संशोधनानुसार, आपल्या अवयवांच्या वृद्धत्त्वाचा दर वेगवेगळा असतो. हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि फुफ्फुसांसह ११ प्रमुख अवयवांमधील वृद्धत्त्वातील फरकांचे विश्लेषण करण्यासाठी संशोधकांनी मशिन लर्निंग मॉडेल्सचा वापर केला. त्यांना आढळले की, काही प्रमुख अवयवांचे जलद वृद्धत्व २०-२५% ने मृत्यूचा धोका वाढवते.

५ लाख लोकांच्या डीएनए डेटाचा अभ्यास

मिशिगन विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ जियानझी झांग यांनी ब्रिटनच्या बायोबँकमध्ये असलेल्या पाच लाख ब्रिटिश नागरिकांच्या डीएनए डेटाचा अभ्यास केला.

या लोकांच्या आरोग्याचा, प्रजनन क्षमतेचा काय संबंध आहे, हे त्यांनी शोधून काढले. ते म्हणाले की, पुनरुत्पादनासाठी चांगले असणारे जीन्स दीर्घायुष्यासाठी खराब ठरण्याची शक्यता पाचपट अधिक असते.

हे उत्परिवर्तन अनेक पिढ्यांनंतर एक ओझे बनतील. वाढत्या प्रजनन क्षमतेमुळे त्या प्रजाती लवकर नष्ट होतील, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

प्रजननासाठी उत्परिवर्तनामुळे आयुर्मान कमी होण्याचा धोका असला तरी चांगल्या अन्न, औषधांनी त्याचा परिणाम कमी करता येतो. - डॉ. ॲर्पिंग लाँग, संशोधक

Web Title: Are Fertility Genes Shortening Life? Researchers claim; Mutation becomes a burden after many generations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.