ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत? एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासाचं स्पष्टीकरण

By Admin | Published: June 29, 2017 07:01 AM2017-06-29T07:01:36+5:302017-06-29T07:23:25+5:30

"नासा म्हणतं... परग्रहवासी येत आहेत..." या मथळ्याखाली एक व्हिडीओ अपलोड करून एका मोठ्या हॅकर्स ग्रुपने खळबळ उडवून दिली

Are you alone in the universe? NASA explanation about the existence of aliens | ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत? एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासाचं स्पष्टीकरण

ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत? एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासाचं स्पष्टीकरण

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 29 - "नासा म्हणतं... परग्रहवासी येत आहेत..." या मथळ्याखाली एक व्हिडीओ अपलोड करून एका मोठ्या हॅकर्स ग्रुपने खळबळ उडवून दिली होती. या दाव्यानंतर जगभरात विविध चर्चांना उधाण येऊनही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाकडून स्पष्टीकरण देण्यात येत नव्हतं, त्यामुळे नासावर टीका होत होती. आता अखेर नासाच्या विज्ञान मिशन संचालनालयाचे असोसिएट एडमिनिस्ट्रेटर थॉमस झुर्बुचेन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.  
 
ब्रम्हांडात एलियन्सच्या अस्तित्वाचा नासाने शोध घेतला असून लवकरच त्याबाबत मोठा खुलासा करणार असल्याचा दावा तीन दिवसांपूर्वी एनॉनिमस या हॅकर्स ग्रुपने केला होता. "अनेक वर्षांपासून नासा एलियन्सचं अस्तित्व शोधण्यावर काम करत आहे, आता एलियन्सचं अस्तित्व असल्याचे सबळ पुरावे नासाकडे उपलब्ध झाले असून लवकरच ते याबाबत खुलासा करणार आहेत" असा संदेश एका 12 मिनिटांच्या व्हिडीओतून देण्यात आला होता. गेल्या काही वर्षांमध्ये नासाने एलियन्सबाबत केलेलं संशोधन आणि नासाचे असोसिएट एडमिनिस्ट्रेटर थॉमस झुर्बुचेन यांच्या एप्रिल महिन्यातील अमेरिकी संसदेमधील भाषणाचा व्हिडीओ वापरून हा दावा करण्यात आला होता. या व्हिडीओत ""आम्ही परग्रहवासीयांचं अस्तित्व शोधण्याच्या, इतिहासातील सर्वात सखोल आणि अद्वितिय शोधाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत... ""असं झुर्बिचेन बोलताना दिसले. आता या सर्व प्रकारावर झुर्बिचेन यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. 
 

""परग्रहवासीयांविषयी घोषणा करण्यासारखं नासाकडे सध्यातरी काही नाही...मीडियामध्ये आलेलं वृत्त चुकीचं आहे.... ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत का?  हे आम्हालाही अजून नक्की माहिती नाही ... पण या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आमचे अनेक मिशन सुरू आहेत"", असं ट्विट करून एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासा सध्यातरी कोणताही खुलासा करणार नसल्याचं झुर्बिचेन यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: Are you alone in the universe? NASA explanation about the existence of aliens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.