अर्मेनियात सशस्त्र गटाचा पोलीस इमारतीवर कब्जा
By admin | Published: July 18, 2016 06:09 AM2016-07-18T06:09:00+5:302016-07-18T06:09:00+5:30
अर्मेनियातील सशस्त्र गटाच्या नेत्याने रविवारी येथील पोलीस इमारत ताब्यात घेऊन एका पोलिसाला ठार मारले
येरेव्हान (अर्मेनिया) : अर्मेनियातील सशस्त्र गटाच्या नेत्याने रविवारी येथील पोलीस इमारत ताब्यात घेऊन एका पोलिसाला ठार मारले व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर कित्येकांना ओलीस ठेवले आहे. हा गट सध्या तुरुंगात असलेल्या विरोधी नेत्याशी संबंधित आहे. अर्मेनियाचे अध्यक्ष सेर्झह सर्किसियन यांनी राजीनामा द्यावा आणि राजकीय कैद्यांची सुटका करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे एका बंदूकधाऱ्याने म्हटले. देशात बंड सुरू असल्याच्या अफवांचे खंडन देशाच्या सुरक्षादलांनी सोशल मिडियाद्वारे केले आहे.
येथील पोलीस पलटणीच्या इमारतीत सशस्त्र लोकांचा गट शिरला व त्याने हिंसाचार घडवू अशी धमकी देत तेथील लोकांना ओलीस ठेवले, असे अर्मेनियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सेवेने निवेदनात म्हटले. यात एक पोलीस ठार तर दोघे जखमी झाले. दोन ओलिसांची सुटका झाली, असेही त्यात म्हटले. सशस्त्र लोकांपैकी एकाने येरेव्हानच्या एरेबुनी जिल्ह्यातील या पोलीस ठाण्यात ओलीस धरण्यात आलेल्यांमध्ये देशाचे उप पोलीस प्रमुख असल्याचे सोशल मिडियाद्वारे सांगितले. ओलिसांची भेट संसद सदस्य निकोल पशिनयान यांनी घेऊन नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या ताब्यात आठ पोलीस असून त्यापैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांनी सोडून दिले. (वृत्तसंस्था)
>झिरेर यांची सुटका करा
अर्मेनियात दैनंदिन व्यवहार सुरळीत असून नागरिकांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पोलीस बजावत आहेत. देशात बंड झाल्याच्या अफवांचे निवेदनात खंडन करण्यात आले आहे. विरोधी राजकीय नेते झिरेर सिफिलयान यांना शस्त्र बाळगल्याबद्दल गेल्या महिन्यात अटक करण्यात आली असून त्यांची सुटका करावी अशी या गटाची मागणी आहे.